नागपूर : एकीकडे नागपूरचे तापमान सातत्याने वाढत आहे. भीषण उकाडा आहे. तर दुसरीकडे विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील आठवडाभरापासून दररोज शहरात कुठे ना कुठे वीज गूल होत आहे. यासोबतच शहरात ब्रेकडाऊन व ट्रिपिंगसुद्धा वाढली आहे. इतकेच नव्हे तर मेंटेनन्सच्या नावावरही वीज बंद ठेवली जात आहे.
राज्यात लोडशेडिंगचे संकट अजूनही कायम आहे. वीजहानी अधिक असल्यामुळे शहरातील २४ फिडर अजूनही त्याच्या तावडीत आहेत. मागच्या महिन्यात दोन दिवस या फिडरवर लोडशेडिंग झाली. शहरतील इतर फिडरवर लोडशेडिंग झालेली नाही; परंतु तांत्रिक कारणांचा फटका मात्र त्यांच्यावर बसत आहे. वीज वितरण सशक्त करण्यासाठी दर आठवड्यात बुधवारी मेंटेनन्स केले जात आहे. अशा वेळी ही परिस्थिती निर्माण झाल्याने मेंटेनन्सच्या कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासाठी महावितरणचे अधिकारी २०११ ते २०१९ पर्यंत वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणारी फ्रेन्चाईजी एसएनडीएलला जबाबदार धरत आहेत. कंपनीच्या कार्यकाळात पायाभूत विकासाची कामे झालेली नाही. त्या तुलनेत दरवर्षी विजेची मागणी वाढत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गोदामांमध्ये ठेवलेले ३०० ट्रान्सफाॅर्मरचा वापर मात्र महावितरणने केलेला नाही.
बहुतांश ट्रान्सफाॅर्मर ओव्हरलोड
महाल, गांधीबाग व सिव्हिल लाइन येथील जवळपास २५ टक्के ट्रान्सफाॅर्मरवर अतिरिक्त भार आहे. ओव्हरलोड असल्याने ट्रिपिंग होत आहे. महावितरणचे अधिकारी मात्र ही बाब मान्य करायला तयार नाही. अधिक तापमान व विजेची वाढती मागणी यामुळे ट्रिपिंग होत असल्याचा महावितरण अधिकाऱ्यांचा दावा आहे.