नागपूर : नागपुरात शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानाजवळ वीज पडली. विमानातील ५९ प्रवाशांना काहीच झाले नाही; पण नियमित तपासणी करीत असलेले दोन अभियंते विजेच्या झटक्याने जखमी झाले. यापैकी एक बेशुद्ध पडला, तर दुसऱ्याच्या हातातील त्राण गेला. या दोघांना किंग्जवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता इंडिगोचे ६ई ७१९७ विमान लखनौहून नागपुरात पोहोचले. त्यानंतर ते अहमदाबादला रवाना होणार होते. त्याआधी नागपूरचे अमित आंबटकर (२८) आणि उत्तराखंड काशीपूर येथील ऋषी सिंह (३३) हे दोघे अभियंते विमानाची नियमित तपासणी करीत होते. त्याचवेळी विमानाजवळ वीज पडली. या घटनेत आंबटकर बेशुद्ध झाले, तर ऋषी यांच्या एका हातातील त्राण गेला. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. लखनौ-नागपूर-अहमदाबाद या विमानाचे संचालक ७२ सीटांच्या एटीआर विमानाने करण्यात येते.
विजेचा विमानावर परिणाम नाही
विमानावर बसविलेल्या विशेष यंत्रणेमुळे विजेचा विमानावर काहीही परिणाम झाला नाही. पण कधीकधी विजेचा विमानाचे सेन्सार वा नेव्हिगेशनवर परिणाम होतो. ३० जुलैला गो-फर्स्टचे जी८ २५१९ दिल्ली-नागपूर विमानावर आकाशातच वीज पडली होती. यातील नेव्हिगेशन यंत्रणा खराब झाली होती. त्यामुळे हे विमान मुंबईला रवाना झाले नव्हते.
अभियंत्यांची प्रकृती स्थिर
विमानतळावर डॉ. एहतेशाम यांनी अभियंत्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना ॲम्ब्युलन्सने विमानतळावरून किंग्जवे रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर डॉ. अतुल सोमानी यांनी उपचार केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
एजाज शामी, उपमहाव्यवस्थापक, कम्युनिकेशन, किंग्सवे हॉस्पिटल.