नागपूर : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ८ लाख १२ हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार असून, यात १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल दिले जाणार आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिवाळीप्रमाणेच मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. हा शिधा केवळ एकदाच मिळणार आहे. यात केवळ १०० रुपयांमध्ये उपरोक्त शिधा दिला जाणार आहे.
गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिधा एकवेळ दिला जाणार आहे.
जिल्ह्यात कोणाला मिळणार ?
नागपूर जिल्ह्यात व शहरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्वच शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. नागपूर शहरात एकूण ३ लाख ९२ हजार व ग्रामीण भागात ४ लाख २० हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या सर्वांनाच याचा लाभ मिळणार आहे.
काय मिळणार ?
गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिल महिन्यात १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल मिळेल.
दिवाळीत उशिरा मिळाला होता ‘आनंदाचा शिधा’
राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे दिवाळीतही आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता; परंतु दिवाळीत अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा उशिरा पोहोचला होता.
दिवाळीप्रमाणेच पुन्हा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिवाळीत काही ठिकाणी उशीर झाला; परंतु आता तसे होणार नाही. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळेल.
रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी