लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : लिम्बाे स्केटिंग प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव चमकविणारी सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने पुन्हा एक नवा विक्रम केला. सृष्टीने आपल्याच जुन्या रेकॉर्डला मागे टाकत १.६९४ सेकंदाची नोंद केली आहे. सृष्टीने केवळ बारा इंच उंचीवर ठेवण्यात आलेल्या दहा फूट लांबीच्या दहा लोखंडी सळाकीच्या आतून ९ मीटरचे हे अंतर १.६९४ सेकंदात पूर्ण करण्याची किमया साधली. यापूर्वी तिच्याच नावावर लिम्बो स्केट प्रकारात सदर रेकॉर्ड १.७२० सेकंदाचे होते.
वेकोली उमरेड येथील स्केटिंग रिंकवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीड मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, महाप्रबंधक आलोककुमार श्रीवास्तव, श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, जिल्हा परिषद सदस्या नेमावली माटे, पंचायत समितीचे उपसभापती सुरेश लेंडे, पंचायत समिती सदस्य गीतांजली नागभीडकर, सरपंच योगिता मानकर आदींची उपस्थिती होती. धर्मेंद्र शर्मा, शिखा शर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सृष्टी शर्मा हिला लोकमत समूहाने वेळोवेळी सहकार्य केले असून, तिच्या या नवीन कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वकर्मा विकास संस्थेच्या वतीनेही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृष्णकुमार मिश्रा यांनी केले. दिपू पिल्ले, मोहम्मद हुसैन, अस्ताफ शेख, रॉम्पी फ्लोरा, सतीश पारोचे, शेखर श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले.