लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमिशन आणि कर्जाचे आमिष दाखवून शेकडो महिला-पुरुषांकडून लाखो रुपये हडपणाऱ्या एका त्रिकुटाविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भीमराव एकनाथ मेश्राम (आशीर्वाद नगर), जयवंत बहादुरे आणि अंशुल कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर नगरात व्हीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नावाने दुकानदारी सुरू केली.
त्यांनी ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांशी संपर्क साधला. तुम्ही सहा लोकांचे बचत गट तयार करा. प्रत्येक सदस्याकडून अडीच हजार रुपये गोळा करा. त्यावर तुम्हाला दहा टक्के कमिशन मिळेल आणि प्रत्येक सदस्याला एक लाख रुपयांच्या पॉलिसीचा बॉण्ड तसेच ४५ हजार रुपयाचे कर्ज मिळेल, असे आमिष या त्रिकुटाने दाखवले. शेकडो लोकांना बचत गट तयार करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून फेब्रुवारी २०२० पासून या त्रिकुटाने रक्कम उकळणे सुरू केले. संबंधितांना कोणत्याही प्रकारचे कर्ज अथवा कमिशन न देता गाशा गुंडाळला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमरावती येथील रहिवासी शीतल प्रीतम शिवणकर यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील भीमराव मेश्राम याला अटक करण्यात आली असून जयवंत बहादुरे आणि अंशुल कांबळे यांची चौकशी सुरू आहे.विदर्भात नेटवर्कयेथे त्रिकुटाचे फसवणुकीचे नेटवर्क संपूर्ण विदर्भात असल्याची माहिती आहे. त्यांनी अशाप्रकारे अनेकांना गंडा घातला असला तरी अजून त्याचा बोभाटा झाला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार शांत असल्याची चर्चा आहे.