लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईला कोरोनाची लागण झाल्याचा थाप मारून दोन भामट्यांनी एका वृद्ध मिरची व्यापाऱ्याला साडेचार लाख रुपयांचा चुना लावला. सुभाष नथुजी वाघमारे (६०) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते जयताळ्यात राहतात. मिरचीचा व्यापार करणारे वाघमारे ३० एप्रिलला सकाळी १० वाजता त्यांच्या दुकानात जात असताना, बाजूला दोन तरुण त्यांना रडताना दिसले. माणुसकीखातर वाघमारे यांनी त्यांना जवळ जाऊन विचारपूस केली. आरोपींनी आईला कोरोना झाल्याची थाप मारली. तिच्या उपचारासाठी पैशाची गरज असून, सोन्याचे दुकाने बंद असल्यामुळे आम्हाला सोने गहाण ठेवून कोणी पैसे द्यायला तयार नसल्याचे सांगितले. आमचे दागिने ठेवून तात्पुरती मदत करा, आम्ही त्यानंतर ५० हजार रुपये जास्त देऊ, असे आरोपी म्हणाले. विश्वास बसावा, म्हणून त्यांच्याजवळ सोन्याच्या हारामधील चार मनी त्यांनी वाघमारे यांना दिले. तुम्ही तपासून घ्या, नंतर व्यवहार करा, असेही ते म्हटले. वाघमारे यांनी सोन्याचे मनी सराफाकडे तपासले असता, ते असली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, २ मे रोजी आरोपी पुन्हा वाघमारे यांच्याकडे आले. त्यांना सोन्याचा मन्याचा भला मोठा हार देऊन आम्हाला फक्त सहा लाख रुपये द्या आणि हा सोन्याचा हार तुम्ही ठेवून घ्या, असे ते म्हणाले. वाघमारे यांनी त्यांना साडेचार लाख रुपय दिले. सोमवारी तो हार सराफाकडे दाखविला असता, सोन्याचा नसून पितळेचा असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे वाघमारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---