नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील पब्जमधील गैरप्रकारांमुळे विविध चर्चांना उधाण होते व ‘नाईट लाईफ’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अखेर पोलीस प्रशासनाने बार, पब्ज, परमिट रुम्स व रेस्टॉरेन्ट्ससाठी नियमावली जारी केली आहे. यानुसार शहरातील ‘नाईट लाईफ’ व ‘पार्टी कल्चर’ला रात्री दीड वाजेपर्यंतचीच ‘लिमिट’ देण्यात आली आहे. यानंतर कुणीही पार्टी करताना आढळले किंवा ग्राहकांना सेवा देताना दिसले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा वारंवार लावून धरला होता हे विशेष.
मागील दोन महिन्यांत शहरातील विविध पब्ज तसेच बारमध्ये विविध घटना घडल्या व त्यामुळे तेथील सुरक्षा व नियमांचा मुद्दा चर्चेला आला.या घटनांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेतली असून, पब आणि हुक्का पार्लरची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिशानिर्देश जारी केले. हे दिशानिर्देश ६ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत वैध असतील व त्यानंतर त्याला आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्यात येईल. यानुसार सर्व बार, पब, परमिट रुम्सला दीड वाजेपर्यंतचीच परवानगी देण्यात आली आहे. त्यातही रात्री एक वाजेनंतर कुठल्याही ग्राहकाकडून जेवण किंवा मद्यासंदर्भात ऑर्डर घेण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुले-मुलीदेखील दिसून येतात. मात्र १८ वर्षांखआलील एकाही व्यक्तीला परमिट रुममध्ये प्रवेश देऊ नये व २५ वर्षांखालील कुणालाही मद्य देण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीमुळे बार, रेस्टॉरेन्ट व पबचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘डान्सिंग’वर ‘वॉच’ ठेवण्याचे निर्देश
पब्ज व क्लबमध्ये नाचताना जेवण करणाऱ्यांना धक्का लागून त्याची परिणिती मोठ्या भांडणात होते. हीच बाब लक्षात घेऊन ‘सिटिंग एरिआ’मध्ये नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जर गाणे-म्युझिकचे सादरीकरण असेल तर त्याची लेखी सूचना पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे. विदेशी सादरकर्ते असतील तर १५ दिवसांअगोदर सूचना द्यावी लागणार आहे.
गोंधळ करणाऱ्या ग्राहकांना ‘नो एन्ट्री’गोंधळ करणाऱ्या ग्राहकांना संबंधित आस्थापनांमध्ये प्रवेश नाकारण्यात यावा तसेच त्यांची यादी बनविण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्यावर बंदी का लावली याची सविस्तर लेखी माहिती नोंद करून ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत.
किती बार, पब्ज करणार निर्देशांचे पालन
दिशानिर्देशांनुसार बार, रेस्टॉरेन्ट व परमिट रुम्सला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तेथे बसण्याची क्षमता व रिक्त जागांची माहिती डिस्प्ले करायची आहे. त्याचप्रमाणे कमाल क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देण्यात येऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. प्रॉफिटच्या मागे लागणाऱ्या आस्थापनांकडून अशा नियमांचे खरोखर किती प्रमाणात पालन करण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्त्वाचे निर्देश- सर्व आस्थापनांना परिसरात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य- डीव्हीआरचे दोन सेट्स लावणे आवश्यक- बाऊन्सर्सचे चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे- गुन्हेगारी पार्श्वभूमीचे बाऊन्सर्स नेमता येणार नाहीत- महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था आवश्यक- पार्किंग व वाहतुक कोंडी होणार नाही याची जबाबदारी आस्थापनांकडेच