दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय कार्यालयात कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क, सॅनिटायझर देणे सुरु आहे. हात धुण्यासाठी साबनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु एकाच नळावर अनेकांनी हात धुतले अन् एकच लिक्विड सोपची बॉटल अनेक व्यक्तींनी वापरल्यास कोरोनाचा प्रादुुर्भाव होण्याची शक्यता उरते. त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हात न लावताच लिक्विड सोप हातावर घेण्याची आणि नळही सुरु करण्याचे तंत्र विकसीत केले आहे.अजनी येथील लोकोशेडमध्ये रेल्वे कर्मचारी काम करीत आहेत. तसेच अजनी वर्कशॉपमध्येही रेल्वे कर्मचारी कामाला आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांना वारंवार साबनाने हात धुण्यास सांगण्यात येत आहे. परंतु एकच नळ आणि लिक्विड सोपची बॉटल अनेकांनी वापरली तर कोरोनाचा धोका वाढु शकतो. त्यासाठी अजनी कोचींग डेपोमधील वरिष्ठ सेक्शन अभियंता महेश वालदेव, कनिष्ठ अभियंता कैलाश खातरकर आणि अजनी विद्युत लोकोशेडमधील मुजाहिद हुसेन व वरिष्ठ सेक्शन अभियंता ए. डी. थुल यांनी शक्कल लढविली आहे. त्यांनी हात न लावताच लिक्विड सोप हातावर घेण्याचे आणि नळ सुरु करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. यात लोखंडाचा एक चबुतरा बनविण्यात आला आहे. यात सर्वात वरच्या बाजुला पाण्याची टाकी आहे. या टाकीतील नळाचा संबंध लोखंडी रॉडने खाली जोडण्यात आला आहे. उजव्या बाजुुला एक पायडल बसविण्यात आले आहे. या पायडलवर पाय ठेवताच नळ सुरुहोतो आणि पाय काढला की नळ बंद होतो. तर डाव्या बाजुुला बसविलेल्या पायडलवर पाय ठेवताच बॉटलमधील लिक्विड सोप हातावर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या यंत्रणेत हात न लावताच लिक्विड सोप हातावर घेऊन हात धुणे शक्य झाले आहे. अजनी लोकोशेड आणि कोचिंग डेपोतील कर्मचारी कामावर असताना याचा वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेत आहेत.इतर कार्यालयातही देणार ही सुविधा‘हात न लावता लिक्विड सोप हातावर घेऊन नळही पायानेच सुरु करण्याचे हे तंत्र अजनी लोकोशेड आणि कोचिंग डेपोत वापरण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा रेल्वेच्या इतर कार्यालयात लावण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.............