नागपूर : सावजीमध्ये ग्राहकांना दारूही पुरविणाऱ्या काचीपुरा येथील सुजल सावजी भोजनालयावर पोलिसांनी छापा मारला. रविवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे काचीपुऱ्यातील सावजी हॉटेल व ढाबा संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बजाजनगरातील काचीपुरा येथे डजनभराहून अधिक सावजी हॉटेल व ढाबे आहेत. एखाद दोन सावजी भोजनालय सोडल्यास बहुतांश भोजनालयात ग्राहकांना अवैध पद्धतीने दारूही पुरविण्यात येते. काही संचालकांनी बार रूमचीही सोय केली आहे. ग्राहक बाहेरून दारू घेऊन येतात. शनिवार व रविवारी बहुतांश ग्राहक दारू पिताना दिसतात. झोन १ चे डीसीपी नुरुल हसन यांना याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने रात्री १० वाजता सुजल सावजी भोजनालयात छापामार कारवाई केली. तिथे काही ग्राहक दारू पिताना आढळले. कारवाईची माहिती अन्य ढाबा संचालकांना मिळाल्याबरोबर ते अलर्ट झाले. त्यामुळे पोलिसांना अन्य सावजीतून रिकाम्या हाती बाहेर पडावे लागले. सुजल सावजीचे संचालक संजय दयानंद गुप्ता (५२) मानेवाडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- गृहमंत्र्यांनीसुद्धा टाकला होता छापा
लॉकडाऊनदरम्यान चोरून लपून हॉटेल व ढाबा चालविण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी शहरातील काही ठिकाणी प्रत्यक्ष छापा मारला होता. देशमुख पोलिसांसोबत सुजल सावजी येथेही गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिजलेले अन्न आढळले होते. त्यामुळे सुजल सावजी चर्चेत आले होते.