नागपूर : रेस्टॉरंटमध्ये दारू पीत असताना गरबा खेळण्याची परवानगी देणाऱ्या रेस्टॉरंट संचालकांवर हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरात कडक कारवाई करण्यात आली असून, ग्रामीण भागात रेस्टॉरंट, तसेच ढाब्यांवर खुलेआमपणे अवैध दारू आणि हुक्का देण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी फटकारल्यानंतर ही परिस्थिती बदलण्याचे चिन्ह दिसत आहे.
हिंगणा ठाण्यांतर्गत ४ ऑक्टोबरला रात्री एका रेस्टॉरंटमध्ये दारू पिऊन युवक-युवती गरबा खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ३ ऑक्टोबरला विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना गरबात नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल फटकारले होते. ४ ऑक्टोबरच्या व्हिडीओमुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदारांना तंबी दिली होती. तपासात हा व्हिडीओ हिंगणा ठाण्यांतर्गत महालक्ष्मीनगरच्या संट्रीन फॅमिली रेस्टॉरंटचा असल्याचे समजले. त्यानंतर रेस्टॉरंटचा संचालक विकास सतीजा आणि तेजराव पिसे विरुद्ध कारवाई करण्यात आली.
सूत्रांनुसार ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत संचालित बहुतांश रेस्टॉरंटमध्ये अवैध दारू आणि हुक्का देण्यात येत आहे. शनिवारी-रविवारी रात्री येथे होणाऱ्या पार्ट्या चर्चेचा विषय होत आहेत. पहाटेपर्यंत दारूच्या नशेत नाचणारे युवक येथे आढळतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. गस्त घालणारे पोलीसही याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे विशेष महानिरीक्षकांनी फटकारल्याची माहिती आहे. यात उत्पादन शुल्क विभागही कारवाई करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.