नागपूर : ३१ डिसेंबरला मद्य विक्रीत होणारी वाढ लक्षात घेता शासन आदेशानुसार किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळावरुन विशेष कार्यक्रमासाठी एक दिवसीय परवाने तसेच मद्यसेवन परवाना आवश्यक शुल्क भरुन उपलब्ध करुन देण्याची सोय करुन देण्यात आली आहे. आयोजकांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याच्या तसेच रात्री १० वाजेपर्यंतच परवाना कार्यान्वित राहील या अटीवर एक दिवसीय परवाने मंजूर करण्यात येणार आहेत.
आयोजित केलेल्या समारंभात जर विनापरवाना मद्यवितरण व प्राशन आढळून आल्यास त्यावर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पूर्वतयारी केली असून अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी आठ विशेष पथक गठित केले आहे. ३१ डिसेंबर रोजी विहित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत मद्य वितरण व प्राशन होत असल्यास तसेच विनापरवानगी पार्ट्याचे आयोजन केल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानूसार फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. शासनाने घोषित केलेल्या संचारबंदी कालावधीत मद्यप्राशन व वितरणाबाबत कारवाई करण्यात येणार आहे.
बॉक्स
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीमधूनच परवान्याद्वारे मद्य खरेदी करावी व विनापरवाना आयोजित समारंभांना मद्य वितरण व प्राशनासाठी उपस्थित न राहता सार्वजनिक स्थळी जाण्याचे टाळावे. नागरिकांना अवैध मद्यविक्री, वितरण व वाहतूक या बाबत तक्रार करावयाची असल्यास ०७१२-२७७०४४४ व्हॉटसॲप क्रमांक ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ वर संपर्क करावा.