लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भगवाननगर, अजनीतील एका काँग्रेस नगरसेवकाच्या भावाच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा घालून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त केले. पोलिसांची कारवाई तब्बल चार तास रेंगाळली असताना तिकडे सोशल मीडियावर तसे वृत्त आल्यानंतर पोलिसांनी ही दारू नगरसेवकाच्या घरी नव्हे तर नगरसेवकाच्या भावाच्या घरी भाडेकरू असलेल्या व्यक्तीकडे सापडल्याचे म्हटले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसचे नगरसेवक मनोज गावंडे यांच्या भावाचे नाव अभय गावंडे आहे. भगवाननगरमध्ये त्यांची इमारत आहे. तेथून अवैधपणे विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास छापा घातला. पोलिसांना या छाप्यात विदेशी दारूच्या पाच पेट्यांचे घबाड हाती लागले. ही कारवाई लगेच सोशल मीडियावर लिक झाली. नगरसेवकाच्या घरी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना २३९ बाटल्या सापडल्याचे वृत्त झपाट्याने व्हायरल झाले. विशेष म्हणजे, रात्री ९ वाजेपर्यंत अजनी पोलीस ठाण्यात या कारवाईची साधी कुणकुण नव्हती. नंतर मात्र पत्रकारांकडून अजनी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडे सारखी विचारणा झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई झाल्याचे मान्य केले. मात्र, नगरसेवकाकडे नव्हे तर नगरसेवकाच्या घरी भाड्याने राहणारा फटाका व्यवसायी राजेश श्रीवास्तव हा दारू विकत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांनी सांगितले. या गुन्ह्याशी नगरसेवक अथवा त्यांच्या भावाचा संबंध नसल्याचेही ते म्हणाले.
----
गोलमाल, मालामाल ?
या कारवाईत गोलमाल झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. कारवाईदरम्यान ‘मालामाल लॉटरी’चाही आरोप झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यासाठी अजनी पोलीस ठाण्यात पोहचण्यासाठी तब्बल पाच तास का लागले, तो देखिल संशयाचा मुद्दा ठरला आहे. सोबतच वरची खोली भाड्याने घेणारा भाडेकरू वर्षभरापासून दारूचा धंदा करतो आणि नगरसेवक अथवा नगरसेवकाच्या भावाला ते लक्षात कसे आले नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे.
----