नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार सूचना, निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अवैध धंदे तसेच गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी आयुक्तालयात तयार झाली आहे. डिफॉल्ट मोडमध्ये गेलेल्या या ठाणेदारांच्या बदल्यांचे आदेश लवकरच निघणार आहेत. पाच ते दहा ठाणेदारांचा त्यात समावेश असून त्यांचे आदेश एकसाथ काढायचे की दोन टप्प्यात त्यावर चर्चा सुरू असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपुरात रुजू झाल्याझाल्या उपराजधानीला गुन्हेगारीमुक्त शहर (क्राईम फ्री सिटी) बनविण्याचा संकल्प सोडला होता. हा संकल्प जाहीर करण्यापूर्वी त्यांनी ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळणाºया वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सर्वप्रथम वर्ग घेतला. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू, चरस, गांजा, एमडी, मटका, जुगार अड्डे अथवा कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.गुन्हेगार, अवैध धंदे करणारे, भूमाफिया, रेतीमाफिया यांच्यासोबत मैत्री ठेवू नका, असेही खडसावून सांगितले. त्यानंतर विविध उपक्रम राबवून शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अवैध धंदेवाल्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली.मोठ्या प्रमाणात एमपीडीए, मकोका कारवाई केली. दोन-तीन वगळता सर्वच मोठ्या गुन्हेगारांना कारागृहात डांबले. एकीकडे हे सुरू असताना काही ठाणेदारांनी त्यांच्या क्षेत्रात अवैध दारू, मटका, जुगार अड्डे यांना अर्थपूर्ण मूकसंमती दिली आहे. त्यामुळे बिनबोभाट हे अड्डे सुरू आहेत. वरिष्ठांना कळाल्यानंतर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अड्ड्यांवर दुसरेच पोलीस पथक छापा घालतात. काही पोलीस ठाण्यात जमिनी बळकावणाºया भूमाफियांच्या दलालांची उठबस आहे. भूमाफियाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कुणाची तक्रार आली, त्यांना घरबसल्या कळते. कोट्यवधींच्या मालमत्तेच्या संबंधाने काही जण लाखोंची सुपारी देऊन घेऊन प्रकरण एनसी करतात. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा चालविण्याच्या वादातूनच कुख्यात विजय मोहोडची त्याच्या प्रतिस्पर्धी गुंडांनी निर्घृण हत्या केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहराच्या सीमेवर असलेल्या वाठोडा, वाडी आणि कळमना, कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती-मातीची तस्करी जोरात आहे. प्रतिबंधित तंबाखू, सुगंधित तसेच सडकी सुपारीचे गोदाम बिनबोभाट सुरू आहेत. अवैध दारू आणि रेती तस्करांचाही जोर आहे. यातून रोज लाखोंची उलाढाल होते. काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी, दारू, गांजा, मटक्यासह चोरीच्या वाहनांची, बंद पडलेल्या कंपन्यांतील लाखोंच्या साहित्याची कबाडी रातोरात कटाई करीत आहेत. गुन्हेगार अवैध धंद्यातून मिळणाºया रसदीमुळे गब्बर बनतात. अवैध धंदेच उद्ध्वस्त केले तर गुन्हेगारांचे कंबरडे मोडेल, असे पोलीस आयुक्त वारंवार सांगत असूनही त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तालयातून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, पाच ते सात पोलीस ठाण्यातील कारभारी बदलवण्याचा निर्णय डिसेंबरच्या प्रारंभी घेण्यात आला होता. मात्र, अधिवेशनामुळे तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. अधिवेशनाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. अवैध धंदे आणि गुन्ह्याच्या संबंधाने काही घडामोड झाल्यास, कुठे छापा पडल्यास, मोठा गुन्हा झाल्यास वारंवार विचारणा करूनही संबंधित ठाणेदार सकाळपासून रात्रीपर्यंत माहिती देत नाहीत. हत्या, अपहरण, बलात्कार, गोळीबारासारख्या प्रकरणातही सकाळचा गुन्हा (गुन्ह्याची माहिती) सायंकाळपर्यंत उघड होणार नाही, याची काही ठाणेदार खास काळजी घेतात. याउलट चुकून एखादा दारूविक्रेता हाती लागला आणि पाच-दहा हजारांची दारू किंवा भुरटा चोर पकडल्यास मोठी कामगिरी बजावल्याच्या प्रेसनोट संबंधित ठाण्याची मंडळी व्हायरल करतात. या गोपनीयता आणि प्रपोगंडा वॉरमध्ये बेलतरोडी, गिट्टीखदान, कळमना पोलीस ठाणे सर्वात पुढे आहे.हे आहेत यादीत !बदली आणि खांदेपालटांच्या यादीत सीताबर्डी, वाडी, बजाजनगर, एमआयडीसी, कळमना, हुडकेश्वर, गिट्टीखदानसह आणखी दोन पोलीस ठाण्यांच्या ठाणेदाराची नावे आहेत. यातील काहींचे नाव डिफॉल्ट यादीत आहे तर, त्यांच्या रिक्त जागी काही ठाणेदारांना पाठविले जाणार आहे. अर्थात त्या ठाण्याच्या क्षेत्रातील स्वच्छता मोहिमेची जबाबदारी त्यांना दिली जाणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठाणेदारांच्या बदलीची यादी रोखण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी शहर पोलीस दलात खांदेपालट होऊ शकतो.
डिफॉल्ट मोडमधील पोलीस निरीक्षकांची यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 11:35 AM
वारंवार सूचना, निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अवैध धंदे तसेच गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी आयुक्तालयात तयार झाली आहे.
ठळक मुद्देशहरातील ठाणेदारांच्या बदल्या लवकरच निघणार आदेश