लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी नव्या पिढीची गायिका म्हणजे श्रेया घोषाल! तिच्या मधाळ आणि तितक्याच खट्याळ स्वरांनी रसिकांना भुरळ घातली आहे. देवदासच्या ‘डोला रे डोला...’ पासून सुरू झालेला तिच्या मखमली स्वरांचा सिलसिला आत्ताच्या ‘घुमर...’पर्यंत कायम आहे. २०० पेक्षा अधिक चित्रपटांमधून तिचे मोहमयी स्वर निनादले, जे पुढेही निनादत राहतील. अशा स्वरमंजिरी श्रेयाला प्रत्यक्ष ऐकण्याची संधी ‘सूर ज्योत्सना अवॉर्ड’च्यानिमित्ताने नागपूरकरांसाठी चालून आली असून, तिचे स्वरमाधुर्य ऐकण्यासाठी रसिकांचे ‘अधीर मन झाले...’ आहे.लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे २३ मार्च रोजी आयोजित सहाव्या सांगितिक पर्वात श्रेया घोषाल ‘लाईव्ह कॉन्सर्ट’च्या माध्यमातून श्रेयाच्या स्वरमाधुर्याची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. श्रेया ‘सा.रे.ग.म.प.’मध्ये स्पर्धक म्हणून गायला आली आणि परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या संगीतकार कल्याणजी यांनाही तिच्या स्वरांची भुरळ पडली. ती स्पर्धेची विजेती ठरलीच, पण तिचे स्वर स्पर्धेपुरते मर्यादित नव्हतेच. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’मधून पहिली संधी तिला दिली आणि या मखमली स्वरांनी लोकांवर जादू केली. ‘बैरी पिया..., डोला रे..., मोरे पिया..., सिलसिला ये चाहत का...’ या गीतांची मोहिनी चढली. मग श्रेयाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. ती कधी हळुवार होती, तर कधी खट्याळ. कधी रोमान्स तर कधी विरह. ‘जादू है नशा है..., अगर तुम मिल जाओ..., छन छन मन गाये क्यों..., सुना सुना लम्हा लम्हा..., शिकदूम..., पिया बोले पिहू बोले..., धीरे जलना..., पल पल हर पल..., होठ रसिले तेरे..., ये ईश्क हाये जन्नत दिखाये..., मेरे ढोलना सुन..., बरसो रे मेघा मेघा..., चिकनी चमेली..., नगाडे संग ढोल बाजे..., तेरी ओर तेरी ओर..., तुझमे रब दिखता है..., मै तैनू समझावा की...’, बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा ग पोरी पिंगा...’, पद्मावतचे ‘घुमर..’ अशा अनेक गीतांचे स्वरसौंदर्य रसिकांवर बरसले.संगीताला भाषेचे बंधन नसते, तसे श्रेयाच्या स्वरांनाही राहिले नाही. मूळची बंगाली, पण मराठी, तामीळ, कन्नड, मल्याळम, आसामी अशा विविध भाषांमधून तिचे स्वर निनादले. केवळ मराठीतच तिने १०० च्या आसपास गाणे गायले आहेत. आठवा ते ‘जोगवा’ चित्रपटातलं, ‘मन रानात गेलंजी..., जीव रंगला...’, नीळकंठ मास्तरचे ‘अधीर मन झाले...’, पक पक पकाक, लई भारी, डबल सीट, देवा अशा अनेक चित्रपटांमधून तिचा आवाज गुंजला आणि रसिकांना भावला. अशा प्रतिभावंत गायिकेला ऐकण्यासाठी कुणाचे मन अधीर होणार नाही?आर्या आंबेकर, शिखर नाद कुरेशींना पुरस्काराने गौरविणारलोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९ चे वितरण शनिवारी, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे. सेलो प्रेझेंट, पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रेडिओ पार्टनर रेड एफएम असून, समारंभाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर रेडिसन ब्लू आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या भव्य समारंभात आपल्या सुमधूर आवाजाने महाराष्ट्रावर जादू करणारी ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना ‘सूर ज्योत्स्ना अवॉर्ड-२०१९’ने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह पाच फिल्मफेअर आणि २०१८ चा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्कारप्राप्त गायिका श्रेया घोषाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.