नागपूर : ‘ग्रीन एन्व्हायरो मूव्हमेंट’ महावृक्षारोपण चळवळीअंतर्गत एलआयटीच्या परिसरात एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या या झाडांमुळे एलआयटीचा परिसर लवकरच ‘ऑक्सिजन पार्क’ होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (लिटा)च्या वतीने व ग्रीन फाउंडेशन नागपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग), टी&टी इन्फ्रा-लिमिटेड आणि भारत विकास परिषद (स्मार्ट सिटी विभाग, नागपूर) यांच्या सहकार्याने ‘हरित पर्यावरण चळवळ (जीइएम)’ या महावृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चळवळीअंतर्गत एलआयटी परिसरात एक हजार झाडे लावण्यात आली, तर संपूर्ण भारतातील १०० ठिकाणी एक लाख झाडे लावण्यात आली.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे सल्लागार अशोक कुमार जैन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी)चे संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे अध्यक्ष माधव लाभे, प्रकल्प प्रमुख श्रीकांत गुडधे, सचिव उत्कर्ष खोपकर, ग्रीन फाउंडेशनचे दिलीप चिंचमलातपुरे, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन डॉ. सुगंधा गारवे यांनी केले.
-वृक्षारोपणासाठी पुरस्कृत करणार
नागपुरातील रिमोट सेन्सरच्या कार्यालयाला प्रत्येक जिल्हा, महानगर, ग्रामपंचायत, नगरपालिकांनिहाय झाडांची माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. यापुढे जे जिल्हाधिकारी, महापौर, मनपा आयुक्त, नगरपरिषद अध्यक्ष, सरपंच त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाधित झाडे लावतील, त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. विद्यापीठानेही प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.