नागपूर : मकरसंक्रांतीला आठवडाभर वेळ आहे, पण आतापासृूनच सुरू झालेल्या पतंगबाजीमुळे शहरात गळाकापी सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी फारुखनगरातील एका चिमुकलीचा जीव या मांजामुळे जाता जाता वाचला. अतिशय गंभीर दुखापतीला तिला समोरे जावे लागले.
शबनाज बेगम असे मांजामुळे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. फारुखनगरातील कल्लू किराणा दुकानाजवळ ती किरायाने राहते. शुक्रवारी दुपारी शाळेतून आल्यानंतर ती घरापुढे खेळत होती. परिसरात काही पतंग शौकीन इमारतीवर पतंग उडवित होते. शबनाज खेळत असताना पतंगाचा मांजा तिच्या गळ्यात अडकला. पतंग उडविणाऱ्यांकडून तो जोरात ओढला गेल्याने शबनाजचा गळाच कापला गेला. रक्तबंबाळ झालेली शबनाज जोरजोरात ओरडू लागल्याने पतंग उडविणारे लगेच पळून गेले. वडील मोहम्मद हसमत शेख हे तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून जखमेवर २६ टाके बांधले. अजूनही शबनाजची प्रकृती चिंताजनक आहे. तिचे वडील छोटेमोठे काम करून घर चालवितात. पतंगामुळे मुलगी जखमी झाल्याने हे कुटुंब धास्तावले आहे.
पतंगाच्या नायलॉन मांजाला विरोध होत असला आणि त्यावर कायदेशीर बंधन असले तरी त्याचा वापर सुरूच आहे. मकरसंक्रांतीच्या काळात पतंगबाजीला अधिकच जोर येतो. यात नायलॉन मांजाही वापरला जातो. यासंदर्भात पाचपावली पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, या घटनेची नोंद नाही. पण तक्रार झाल्यास कारवाई करू असे सांगण्यात आले.