नागपूर : विकास कामांना अडथळा ठरणारी झाडे तोडून त्याऐवजी पाचपट झाडे लावावी आणि ती जगवावी, असा नियम आहे. विकास कामात अडथळा आणणारी १६०० झाडे तोडण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला होता. त्याऐवजी केवळ ११५० झाडे तोडली आणि त्या बदल्यात अंबाझरी जंगलात २१० एकर जागेवर ‘लिटिल वूड’ व लिटील वूड एक्स्टेंशन या नावाने ११,५०० विविध प्रकारची झाडे आणि बांबूचे वन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग महामेट्रोने करून दाखविला आहे. झाडे लावा, जगवा आणि हस्तांतरित करा, असा हा प्रयोग आहे.
वर्ष २०१७-१८ मध्ये हिंगणा मार्गावर यशोदरानगरजवळील अंबाझरी जंगलात ७५ एकर जागेवर रानमेवा, वनौषधी, फुले आणि औषधी प्रकारातील ८ ते १० फूट उंचीची ५ हजार झाडे राजमुंद्री (हैदराबाद) येथून आणून लावली. त्या ठिकाणी अंबाझरी तलावातील गाळ उपसून टाकला आणि २० टक्के खते टाकली. त्याकरिता पंप हाऊस तयार केले, विहीर खोदली आणि ड्रीप केले. या संपूर्ण परिसराला एका बाजूला फेन्सिंग केले तर दुसऱ्या बाजूला भिंत आहे. जी झाडे जगली नाहीत, त्या ठिकाणी नव्याने रोपण केले. नियमित जोपासना, फवारणी आणि ड्रीप असल्याने १०० टक्के झाडे जगली. आता झाडांची उंची जवळपास २० फूट झाली असून फळे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांचा वावर वाढला आहे. सकाळी लोकांना फिरण्यासाठी ५.५ किमी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे लिटील वूडमध्ये दररोज हजारो लोक जात आहेत.
याशिवाय वर्ष २०१८-१९ मध्ये महामेट्रोने हायवे ग्लोरी मागील जंगलात १३५ एकरमध्ये पुन्हा ६५०० विविध प्रकारची झाडे आणि ३ हजार बांबूच्या झाडांचे वन तयार केले. याठिकाणीही फेन्सिंग आणि लोकांना फिरण्यासाठी रस्ते तयार केले आहे. लॉन तयार केले असून बसण्यासाठी बेंचेस आहेत. लोकांना जंगलात फिरण्याचा भास होतो. लिटील वूड आणि लिटील वूड एक्स्टेंशन या २१० एकराच्या दोन्ही परिसरात आता लोकांची गर्दी होत आहे.
खडकाळ जमिनीवर जगविली झाडे
अंबाझरी जंगल १९०० एकरात असून त्यातील २१० एकर परिसर महामेट्रोने झाडे लावून आणि जगवून विकसित केले आहे. हा प्रकल्प महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात आणि महामेट्रोचे उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पुरुषोत्तम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदार पीयूष काळे यांनी विकसित केला. दोन वर्ष देखरेखीचे कंत्राट काळे यांच्याकडेच होते.
झाडे जगवा, पैसे परत घ्या!
कुठल्याही विकास कामासाठी झाड तोडून दुसरीकडे लावायची असल्यास मनपामध्ये प्रति झाड एक हजार रुपये भरायचे असतात. झाड जगले तर पैसे परत मिळतात. मेट्रोने विकास कामासाठी १६०० झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती आणि पैसे भरले होते. प्रत्यक्षात ११५० झाडे तोडली आणि त्याबदल्यात अंबाझरी जंगलात २१० एकरवर ११,५०० झाडे लावली. ती झाडे जगविलीसुद्धा. त्यामुळे पैसे परतीसाठी मेट्रोने मनपाकडे अर्ज केला असून पैसे परतीची प्रतीक्षा आहे.
२१० एकरातील लिटील वूड व लिटील वूड एक्स्टेंशनमध्ये अशी आहेत झाडे :
रानमेवा वन
मोहा, उंबर, वेलपत्री, बोर, आवळा, आंबा, सीताफळ, कवठ, चिंच, रामफळ, जांभुळ, पेरु, फणस.
वनौषधी
हरडा, बेहडा, गोधन, चिरोल, शमी, अर्जुन, पाकड, कुसुंब, रिठा, रुद्राक्ष, रक्तचंदन.
इतर प्रकारची औषधी झाडे
आपटा, महारूख, पॉप्युलर अस्थेपेडा, किवी, वड, बकुळ, नीम, सिसो, पिंपळ, करंज, कार्डिया, रोजिया, स्पॅथोरिया.
फुलझाडे
जारुल, मेहगणी, बाहुनिया कांचन, अमलताश.