गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 11:17 AM2022-11-05T11:17:28+5:302022-11-05T11:17:56+5:30
नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते १८ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पदयात्रेत होणार सहभागी
नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेचे’ जिल्ह्यातील गावागावांत थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. त्यासाठी एलसीडी प्रोजेक्टर लावलेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक असे एकूण सहा रथ तयार करण्यात आले आहेत. ११ नोव्हेंबरपासून हे रथ तालुक्याच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये, आठवडी बाजारात उभे करून लोकांना लाईव्ह यात्रा दाखवून वातावरणनिर्मिती केली जाईल. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाल्यावर त्याचे प्रक्षेपणही केले जाणार आहे.
यात्रेत सहभागी होण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस भवनात शुक्रवारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आ. अभिजित वंजारी, माजी आ. एस.क्यू. जमा, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, तक्षशीला वाघधरे, संजय मेश्राम, भारती पाटील, शकूर नागानी, प्रकाश वसु, भीमराव कडू, असलम शेख, तुळशीराम काळमेघ, राहुल घरडे, अरुण हटवार आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते १८ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पदयात्रेत सहभागी होतील. दुपारी शेगाव येथे पोहोचतील व सायंकाळी ४ वाजता आयोजित जाहीर सभेत सहभागी होतील. पूर्वतयारीसाठी रवींद्र दरेकर, किशोर मिरे, प्रकाश बारोकर यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी अकोला, बाळापूर येथे जावून पाहणी करेल.
खरगे यांच्या अभिनंदनाचा ठराव
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खा. मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली. याबद्दल अभिनंदनाचा ठराव नाना गावांडे यांनी मांडला. आ. अभिजित वंजारी यांनी अनुमोदन केले.