सुमेध वाघमारे , नागपूर : हर्नियावर ‘लेप्रोस्कोपीक’ म्हणजे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. परंतु मेडिकलने याच्या एक पाऊल पुढे टाकत रोबोटिक सर्जरी सुरू केली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता व प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. राज गजभिये यांनी हर्नियावरील रोबोटिक सर्जरीचे थेट प्रक्षेपण करीत २००वर शल्यचिकित्सकांना मार्गदर्शन केले. लेप्रोस्कोपिक व रोबोटिक सर्जरीमधील फरकही त्यांनी लक्षात आणून दिला.
मध्यभारतात पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयातून रोबोटिक सर्जरीचे थेट प्रक्षेपण झाले. शल्यचिकित्सकांची संघटना ‘असोसिएशन ऑफ सर्जन’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने ‘हर्निया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात मेडिकलमधील शल्यचिकित्सा विभाग सहभागी होऊन हर्नियावरील रोबोटिक शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण केले. सोबतच उपस्थित शल्यचिकित्सकांच्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. लेप्रोस्कोपिकच्या तुलनेत रोबोटिक सर्जरीला कमी वेळ लागतो. रुग्णाला कमीत कमी वेदना होतात. कमीत कमी रक्त वाहते. शस्त्रक्रिया अचूक होत असल्याने रुग्णाला लवकर रुग्णालयातून सुटी मिळत असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.
डॉ. मुर्तझा अख्तर यांना जीवनगौरव पुरस्कार -
पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून चेन्नईचे प्रा.डॉ. सी. पलानिवेलू, डॉ.धनंजय केळकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. कन्हैया चांडक यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. अभय चौधरी यांनी सचिव पदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी असोसिएशनतर्फे डॉ. मुर्तझा अख्तर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागतपर भाषण माजी अध्यक्ष डॉ. प्राची महाजन तर वार्षिक अहवालाचे वाचन माजी सचिव डॉ मृणालिनी बोरकर यांनी केले. संचालन डॉ.प्रशांत भोवते व डॉ.सुशील लोहिया यांनी तर, आभार डॉ. चौधरी यांनी मानले.
अशी आहे नवी कार्यकारणी-
अध्यक्ष डॉ. कन्हैया चांडक, सचिव डॉ. अभय चौधरी, माजी अध्यक्ष डॉ. प्राची महाजन, माजी सचिव डॉ. मृणालिनी बोरकर, पुढील वर्षीचे अध्यक्ष डॉ. दिवीश सक्सेना. कोषाध्यक्ष डॉ. राहुल नाईकवाडे, उपाध्यक्ष डॉ. आतिष बनसोड, सहसचिव डॉ. प्रसाद उपगनलावार यांच्यासह डॉ. योगेश बंग, डॉ. राजविलास नारखेडे, डॉ. सुशील लोहिया सदस्यांमध्ये डॉ. सुश्रुत फुलारे, डॉ. कपिल पंचभाई, डॉ. घनश्याम चुडे, डॉ. अभिनव देशपांडे, डॉ. निर्मल पटले, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. महेश सोनी, डॉ. उन्मेद चांडक, डॉ. निलेश चांगाळे, डॉ. प्रशांत भोवते, डॉ. अस्मिता बोदाडे, डॉ. सुमीत गाठे, डॉ.गोपाल गुर्जर, डॉ.राजीव सोनारकर. सहनियुक्त सदस्य डॉ. महेंद्र चौहान, आणि डॉ. भूपेश तिरपुडे आदींचा समावेश आहे.