लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया ‘बेरियाट्रिक सर्जरी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार ३० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला मुख्य वक्ता म्हणून जालंधर येथून डॉ. जी.एस. जम्मू आले होते. कार्यशाळेत रश्मी सोनी (४०) या महिलेवर ‘बेरियाट्रिक सर्जरी’ करण्यात आली. त्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) सभागृहात उपस्थित असलेल्या १५० डॉक्टरांना दाखवून मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डात भरती केले. तिच्यावर शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. आतिश बन्सोड उपचार करीत होते. परंतु अचानक महिलेची प्रकृती खालावली आणि ४ आॅक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी महिलेवर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु महिलेच्या पतीने डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावल्याने हे प्रकरण समोर आले.सूत्रानुसार, कुटुंबीयांच्या आरोपाला घेऊन दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. परंतु या विभागात मृतदेह ठेवताना वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकांचा आवाज दाबण्यासाठी हा एक प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मृत्यूचे कारण ‘सेप्सीस’ शरीरात पस निर्माण झाल्याचे दिले आहे. शिवविच्छेदन न करता असे कारण देणे योग्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सेप्सीस’ होण्याला कोण कारणीभूत आहे, हाही एक प्रश्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला घेऊन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी चार सदस्यांची चौकशी समिती तयार केली आहे. त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या समितीत रुग्णालयाबाहेरील तज्ज्ञ घेतले असते तर पारदर्शकता आली असती, असाही सूर उमटला आहे.