आॅनलाईन लोकमतअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत भवानी तलाव परिसरात एक बिबट छावा (बछडा) हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजतादरम्यान घडली. या छाव्यावर घटनास्थळी पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबटाचे वय अंदाजे ८ महिने ते एक वर्ष असल्याचा दुजोरा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.वनविभागाच्या माहितीनुसार, अमरावती येथील रहिवासी असलेले निगर्सप्रेमी राम खरबडे, दीपक ग्वालवंशी हे भवानी तलाव परिसरात फिरत असताना त्यांच्यासोबतच्या १० वर्षीय मुलाला बिबट्याचा छावा पडून असलेला दिसून आला. मुलाने मांजर पडल्याचे सांगून निसर्गप्रेमींचे मृत छाव्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर ही माहिती अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना देण्यात आली. बिबटाच्या डोक्यावर, पायावर, पोटावर तसेच मानेवरही जखमा दिसून आल्या. मार्डी येथील पशूधन विकास अधिकारी राजेश श्रीराव यांनी मृत छाव्याचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट छाव्याच्या शरीरातील काही भाग फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीसाठी सील करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यांची पूर्तता केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बिबट छाव्याला भडाग्नी देण्यात आला.
बिबट छावा हल्ल्यात ठार
By admin | Published: May 21, 2017 5:29 PM