नागपूर : यकृत निकामी झाल्याने केवळ १० महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला. काही इस्पितळांनी कमी वय व कमी वजन असल्याचे कारण देऊन यकृत प्रत्यारोपणाला नकार दिला. त्यात त्याच्या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बेताचीच. मोठ्यांचे यकृत एवढ्या कमी वयाच्या मुलामध्ये प्रत्यारोपण करणे जोखमीचे होते; परंतु न्यू ईरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या सर्व अडचणीवर मात करीत यकृत प्रत्यारोपण यशस्वी करीत चिमुकल्याला जीवनदान दिले.
मोहम्मद अब्बास त्या चिमुकल्याचे नाव. अब्बासला जन्मापासूनच पित्तविषयक ‘अट्रेसिया’ नावाच्या आजार होता. त्यामुळे यकृत निकामी झाले होते. त्याचे वजन कमी होऊन केवळ ६ किलोवर आले होते. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पालकांनी दिल्ली आणि मुंबई गाठले; परंतु कमी वय आणि खूपच कमी वजनामुळे अनेक हॉस्पिटलने शस्त्रक्रियेस नकार दिला. हताश झालेल्या कुटुंबाने शेवटचा पर्याय म्हणून नागपूर येथील न्यू ईरा हॉस्पिटल गाठले.
मावशीने दान दिले यकृत
हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांनी सांगितले, अब्बासचे यकृत प्रत्यारोपण हाच शेवटच पर्याय होता; परंतु त्याच्या आई-वडिलांचे रक्त त्याच्या रक्ताशी जुळत नव्हते. म्हणून ४०वर्षीय त्याच्या मावशीने पुढाकार घेत यकृत दान केले.
आठ डॉक्टरांचे पथक
डॉ. सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली आठ डॉक्टरांच्या पथकाने २१ जून रोजी अब्बासवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. त्यात यकृत प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल व डॉ. आयुष्मान जेजानी, बालरोगतज्ज्ञ डॉ. निशू बन्सल, निओनॅटोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील भिसीकर व बालरोग अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा उपस्थित होते. ही शस्त्रक्रिया १६ तास चालली.
कमी वयाच्या मुलांमध्ये यकृत प्रत्यारोपण क्लिष्ट
डॉ. सक्सेना म्हणाले, अब्बासचे वजन फारच कमी होते, त्यात मोठ्या दात्याकडून काढलेल्या यकृताचा भाग लहान मुलाच्या शरीरात बसविण्यासाठी आकाराने कमी करणे जिकिरीचे होते. त्यासोबतच लहान मुलांच्या रक्तवाहिन्या खूपच लहान असतात, त्या जोडण्यासाठी मोठा वेळ लागतो. परिणामी, प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती.
स्वयंसेवी संस्थांनी उभारला निधी
अब्बासचे वडील हे व्यवसायाने सुतार आहेत. लाखो रुपयांचा निधी उभा करणे त्यांच्यासाठी कठीण होते. यामुळे विविध स्वयंसेवी संस्था व क्राउडफंडिंग संस्थांच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी लागणारा निधी उभा करण्यात आला होता.
न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये ५१वे यकृत प्रत्यारोपण
न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये २०१८पासून यकृत प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. हे ५१वे यकृत प्रत्यारोपण होते. अब्बासला दोन आठवड्यांनंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रत्यारोपणाची टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे.
-डॉ. राहुल सक्सेना, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ.