लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : पंतप्रधान घरकूल याेजनेच्या यादीत नाव असल्याने महिला चाैकशी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेली. कर्मचाऱ्यांनी असंबद्ध उत्तरे दिल्याने तिने माजी पंचायत समिती सदस्याची मदत घेतली. चाैकशीअंती ती महिला मृत असल्याची नाेंद ग्रामपंचायत दप्तरी असल्याचे पुढे आले. जिवंत महिलेला कागदाेपत्री मृत दाखविण्याचा हा प्रकार खात (ता. माैदा) येथे घडला असून, घरकूल याेजनेमुळे ताे उघड झाला.
छबूबाई बागडे (५२, रा. खात) यांना विवाहित मुलगी असून, पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहतात. घरीच छाेटेसे भाजी विक्रीचे दुकान थाटून त्या उदरनिर्वाह करतात. घर माेडकळीस आल्याने तसेच ते बांधण्यासाठी पैसा नसल्याने त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे पंतप्रधान घरकूल याेजनेच्या लाभासाठी अर्ज केला हाेता. सन २०१४-१५ च्या पत्रक ‘ब’मधील यादीत त्यांचा अनुक्रमांक ४० आहे. त्या दाेन दिवसांपूर्वी घरकुलाबाबत चाैकशी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या हाेत्या. कर्मचाऱ्याने असंबद्ध उत्तरे दिल्याने त्या माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांच्याकडे गेल्या. चाैकशीअंती त्यांना कागदाेपत्री मृत दाखविण्यात आल्याचे मुकेश अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यांचा मृत्यू १९ ऑगस्ट २०१९ राेजी झाल्याची नाेंद कागदाेपत्री करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
...
ग्रामपंचायतचा ठराव
ग्रामीण भागात जन्म-मृत्यूची नाेंद करण्याची तसेच संबंधितांना प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे साेपविली आहे. प्रमाणपत्र देण्याचे अधिकार केवळ ग्रामपंचायतच्या सचिवांनाच आहेत. छबूबाई बागडे यांना कागदाेपत्री मृत दाखवण्याबाबत खात ग्रामपंचायत प्रशासनाने १९ ऑगस्ट २०१९ राेजी ठराव पारित केला. हा ठराव आमसभेतील आहे. याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात आले. मृत दाखवण्यात आल्याने त्यांना घरकूल याेजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांचे नाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येत असलेल्या शाैचालय बांधकाम सन २०१६-१७ च्या यादीतही आहे. नंतर ते परस्पर कमी करण्यात आले. नागरिकांच्या मागणीमुळे छबूबाई यांना ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून १२ हजार रुपये देण्यात आले.
...
जबाबदारी स्वीकारणार काेण?
या अगतिक व गरीब महिलेला मृत दाखवून तिच्यावर अन्याय करण्यात आला. ही चूक ज्या कर्मचाऱ्याने केली, त्याच्यावर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी केली आहे. दुसरीकडे, जन्म व मृत्यू दाखले ग्रामपंचायतचे सचिव देतात. सचिवांनी ही नाेंद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना विचारायला हवे हाेते. आमसभा असल्याने आपण कामात व्यस्त हाेते, अशी प्रतिक्रिया सरपंच ज्याेती डहाके यांनी दिली. याबाबत सरपंचांनी माहिती घेणे गरजेचे हाेते. त्यांनी ती महिला जिवंत असल्याचे प्राेसिडिंग लिहितेवेळी निदर्शनास आणून द्यायला हवे हाेते. या प्राेसिडिंगवर सरपंचाचीही स्वाक्षरी आहे, असे ग्रामसेवक मालापुरे यांनी सांगितले. एकंदरीत, या प्रकरणाची जबाबदारी कुणीही स्वीकारायला तयार नाही.
...
त्या जिवंत महिलेला एका चुकीमुळे मृत दाखविण्यात आले आहे. ती घरकूल व इतर याेजनेची लाभार्थी असल्याने तिला संबंधित याेजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दयाराम राठाेड,
खंडविकास अधिकारी, माैदा.