नरेश डोंगरे - कमल शर्मा
नागपूर : आधी लॉयडस् आणि नंतर उत्तम गलवा असे नामकरण झालेल्या स्टील प्लांटने कोट्यवधींची मलाई ओरबडून घेतल्यानंतर कारखान्याचे प्रशासन आणखी काही निष्ठूर हातात दिले. त्यानंतर रोजगाराचा लाॅलीपॉप दाखविणाऱ्या या कारखान्याच्या प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर अक्षरश: सूड उगविणे सुरू केले.
वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांचे स्वप्न दाखविणाऱ्या भूगावच्या या स्टील प्लांटमध्ये सत्तांतराचे आतापर्यंत तीन अंक घडले. प्रत्येक वेळी नवा गडी नवा राज सुरू झाल्याने शेतकरी आणि बेरोजगारांची आशा पल्लवित झाली. आता आपल्या मुलाबाळांना चांगल्या हुद्याची अन् चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी आशा भोळ्या-भाबड्या जनतेला वाटू लागली. मात्र, कसले काय.. कारखान्याचा कारभार चालविणाऱ्या प्रशासनाने या भागातील शेतकरी-गावकऱ्यांच्या जीवावर उठून त्यांचे जगणे धोक्यात आणले. केवळ अन् केवळ वर्षाला शेकडो कोटींची मलाई ओरबडून खाण्याचा सपाटा लावला. दुसरीकडे बेरोजगारांच्या ताटात माती टाकण्याचेही धोरण राबविले.
निर्ढावलेल्या कंत्राटदारांनी बेरोजगारांना दाखविला बाहेरचा रस्ता
सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले. येथे निर्ढावलेले कंत्राटदार आणून बसविले. प्रशासनाच्या इशाऱ्यानुसार वर्धा शहरच काय, कारखान्याच्या आजूबाजूच्या १०० मैलांवरील अंतराच्या आतमधील कोणत्याही रहिवाशाला येथे कामावर घ्यायचे नाही, असा पवित्रा या कंत्राटदारांनी घेतला, त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना डावलणे सुरू झाले.
तरुणांच्या जीवाशी खेळ
जेथे बाहेरचे कुणीच काम करायला तयार नाही, अशा धोक्याच्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना काम दिले जाते. लोखंड पिघळवणाऱ्या भट्ट्यांजवळ आणि तशाच अत्यंत धोक्याच्या ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक कामाला ठेवून त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो. काम करायचे असेल तर करा नाहीतर निघून जा, असे सांगितले जाते. जीवापेक्षा दुसरे काही मोलाचे नाही, असे मानत अनेकजण कारखान्याच्या दाराकडे पुन्हा फिरकत नाही. मात्र, अनेकजण पोटाची आग विझविण्यासाठी जीवाचा धोका पत्करून अल्प पगारात येथे काम करतात.
सुरक्षेची प्रभावी साधनेही नदारद
विशेष म्हणजे, येथील कामगारांना आतमध्ये रक्षेची प्रभावी साधनेही उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप आहे. जुजबी साधनांच्या आधारे धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपले जाते. येथे सुरक्षा वाऱ्यावर असल्याने मोठा बॉयलर स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला होता. सर्वात मोठ्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी कारखाना संचालकांच्या ताटाखालचे मांजर बनल्याने आणि इतर दुसऱ्या लढवय्या कामगार संघटनांना येथे स्थान नसल्याने कामगारांची मुस्कटदाबी सुरू झाली.