लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात विजेची मागणी सातत्याने २१ हजार मेगावॅटच्या स्तरापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागेल, अशी स्थिती दिसून येत आहे.हिवाळा ओसरत चालल्याने वातावरण बदलताच राज्यात विजेची मागणी वेगाने वाढत आहे. बुधवारी राज्यात विजेची मागणी थेट २१५७० मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१८ ला २०७४५ मेगावॅट मागणीचा रेकार्ड नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये नोंदविलेल्या मागणीचा विचार करता यावर्षी ३३२० मेगावॅटपेक्षा अधिक मागणी राहिली, जी १८ टक्के अधिक आहे. २२ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता २१३९२ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने केंद्रासह खासगी संयंत्राच्या भरवशावर ही वाढलेली मागणी पूर्ण करून स्वत:ची पाठ थोपाटून घेतली असली तरी उन्हाळ्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटच्यावर गेल्यास राज्यात भारनियमन लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि तसे संकेतही दिसायला लागले आहेत. दुसरीकडे महाजेनकोच्या अनेक केंद्रावर संकट निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने त्यांना बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट ३ सह नाशिक व परळी येथील युनिटचा समावेश आहे. चंद्रपूरची युनिट क्रमांक ५ आणि ६ आधीच बंद आहेत आणि कोराडीच्या युनिट क्रमांक ६ आणि ७ ची स्थितीसुद्धा सारखीच आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला खासगी संयंत्राचा आधार घ्यावा लागत आहे.एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्याकडून ४१३४ मेगावॅट वीज घेण्यात आली आहे. याशिवाय अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, एम्को आदी खासगी कंपन्यांकडून ४५६७ मेगावॅट वीज घेतल्याने राज्यात भारनियमनाची गरज पडली नाही. मात्र वाढत्या मागणीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना चिंतेत पाडले आहे. मागणीची वाढ लक्षात घेता कंपनीने आतापासून नियोजनाला सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.बंद युनिट सुरू करणार, कोयना सोलरचा आधारमहावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतर्फे लोड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उन्हाळ्यातील वाढती मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी महाजेनकोचे बंद पडलेले युनिट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. अधिक उत्पादन खर्च लागणाऱ्या युनिटमधूनही उत्पादन सुरू केले जाईल. रतन इंडियाच्या बंद पडलेल्या १०८० मेगावॅटचे संयंत्र सुरू करण्यात येईल. उन्हाळ्यात सौर उर्जेचे उत्पादन वाढण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कोयना धरणात मूबलक पाणी असल्याने तेथे जल विद्युतचे उत्पादन वाढवून संकटाचा सामना करण्यात येईल, असा विश्वास दिला जात आहे.
-तर राज्यात उन्हाळ्यात लोडशेडिंग : महाजेनकोचे अनेक युनिट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:09 PM
राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे.
ठळक मुद्देक्षमता १०१७०, उत्पादन ७४१६ : फेब्रुवारीत मागणी २१ हजार मेगावॅटवर