राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राेहिणी संपून मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणांसह अन्य कृषी निविष्ठा खरेदी करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. बहुतांश शेतकरी खरीप पिकांच्या मशागतीला येणारा खर्च पीककर्जाची उचल करून भागवतात. रामटेक तालुक्यात एकूण २० बँकांनी साेमवार (दि. ७) पर्यंत केवळ ९७ शेतकऱ्यांना ११७.४७ लाख रुपये कर्ज दिले आहे. हा आकडा व तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता पीककर्ज वाटपाचा वेग अतिशय संथ असल्याचे दिसून येते. याला लाॅकडाऊन जबाबदार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी वास्तवात बॅंक व प्रशासनात शेतकऱ्यांबाबत असलेली अनास्था कारणीभूत असल्याचे काही जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले की, २८ मे राेजी सर्व बँक अधिकाऱ्यांसाेबत खरीप पीककर्ज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या. बँकांना जे लक्षांक दिलेले आहे, त्याप्रमाणे पीक कर्जवाटप करण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरित निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एकही शेतकरी पीक कर्जाविना राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्याचेही बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.
पीककर्ज वाटपाचे सर्वाधिक ८५४.८० लाख रुपयांचे लक्षांक भारतीय स्टेट बॅंकेला देण्यात आले असून, युनियन बँकेला ८८८.७० लाख रुपयांचे मर सर्वांत कमी १५.४० लाख रुपयांचे लक्षांक एचडीएफसी बॅंकेला देण्यात आले आहे. दुसरीकडे, आपण पीककर्ज घेण्यासाठी बॅंकेकडे उन्हाळ्यात अर्ज केला हाेता. विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नाकीनव आले, अशी माहिती हिवरा (बेंडे) येथील शेतकरी कमलेश वैद्य यांनी दिली असून, नुकतेच कर्ज मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. पीककर्ज वाटपास दिरंगाई हाेत असल्याने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची खरेदी करण्यास अडचणी येत आहेत.
...
७,४९८.३३ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य
रामटेक तालुक्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या १८ व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दाेन अशा एकूण २० शाखा आहेत. या सर्व शाखांना ७,४९८.३३ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ७,१४०.८० लाख रुपये, तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ३५७.५३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे.
...
केवळ १५ टक्के पीककर्ज वाटप
रामटेक तालुक्यात नूतनीकरण व नियमित पीक कर्जधारक शेतकऱ्यांची संख्या ६९५ आहे. यातील काही शेतकऱ्यांना ८२२.९७ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. नवीन कर्जवाटपाचा वेग संथ आहे. आजवर ९७ शेतकऱ्यांना ११७.४७ लाख रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले. नूतनीकरण व नवीन कर्ज अशा एकूण ७९२ शेतकऱ्यांना ९४०.४४ लाख रुपये पीक कर्जाच वाटप करण्यात आले आहे. हा आकडा पीककर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टाच्या १५ टक्के आहे.