लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या तिजोरीकरिता आता लॉबिंग सुरू झाली असून २० फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत स्थायी समिती अध्यक्षपदाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी यावर्षी निवडणुका होणार आहे. निवडणुकांमध्ये शहरात होणाऱ्या विकास कामांच्या आधारे मतदारांना आकर्षित करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनपाच्या कामाचा परिणाम दिसणार आहे.स्थायी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना आर्थिक संकटाच्या काळात मनपाची तिजोरी मिळाली. त्यांनी राज्य सरकारकडून १५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मनपाकडे खेचून आणले. शिवाय जीएसटी अनुदान ५२ कोटींवरून ८७ कोटींवर नेले. त्यामुळे आर्थिक अडचण थोडी दूर झाली. अशा स्थितीत स्थायी समितीचा नवा प्रमुख सक्षम असावा, याकरिता शहर भाजपा प्रयत्नरत आहे. पण निवडणूक क्षेत्राच्या आधारावर अध्यक्षपदावर पूर्व नागपूरचा सर्वाधिक दावा आहे. या क्षेत्रात भाजपाची मोठी व्होट बँक आहे. अशा स्थितीत त्यांचा दावा जास्त आहे.नवीन सरकारमध्ये पश्चिम नागपुरातून संदीप जाधव, उत्तर नागपुरातून विद्यमान अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आहेत. दक्षिण-पश्चिम नागपुरातून महापौर नंदा जिचकार व सत्तापक्ष नेता संदीप जोशी आहेत. उपमहापौर दीपराज पार्डीकर मध्य नागपुरातून आहेत. अशावेळी पूर्व व दक्षिण नागपूरचा स्थायी समितीच्या अध्यक्षादावर मोठा दावा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक ठेवणारे आणि एका विशेष समितीची दुसऱ्यांदा सभापतिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका भाजपा नगरसेवकाने तिजोरीची चावी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण त्यांच्या नावाचा विरोध पक्षातील पदाधिकारी करीत आहेत.स्थायी समिती अध्यक्षपदावर महिला सदस्यांना भाजपा संधी देत नाही. महापौर पदासाठी उपनेते वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे यांचा नावाचा विचार झाला, पण त्यांना संधी मिळाली नाही. पण आता लोकसंख्येच्या आधारावर नागपूरकरांना आकर्षित करण्यासाठी महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपूरचा सर्वाधिक दावा आहे. इच्छुकांनी स्वत:च्या निवडणूक क्षेत्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. भाजपासाठी स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूक हे कठीण काम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंतर अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.उल्लेखनीय असे की, एप्रिलमध्ये लोकसभा आणि आॅक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षांना दोनदा आचारसंहितेची अडचण येणार आहे. भाजपाच्या अनेक सदस्यांचा या पदासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यांनी निवडणुकीत नाराजी व्यक्त केली तर पक्षाला नुकसान होणार आहे.२० फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत भाजपाचे सदस्य नागेश मानकर, कल्पना कुंभलकर, विद्या कन्हेरे, अभिरुची राजगिरे, काँग्रेसचे जुल्फेकार अहमद भुट्टो, मनोज सांगोळे आणि बसपाच्या मंगला लांजेवार १ मार्च २०१९ ला सेवानिवृत्त होत आहेत. भाजपाप्रमाणेच काँग्रेसच्या दोन सदस्यांची निवड विपक्ष नेते तानाजी वनवे यांच्यासमोर डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेसच्या हर्षला साबळे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनाच संधी मिळू शकते. सभेत नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यासोबतच अध्यक्षाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.