‘वज्रमूठ’ला स्थानिकांचा विरोध कायमच, मंचाच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात
By योगेश पांडे | Published: April 12, 2023 04:58 PM2023-04-12T16:58:06+5:302023-04-12T16:58:39+5:30
Nagpur News सद्भावना नगरातील दर्शन कॉलनीतील मैदानात ‘वज्रमूठ’ सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम असून तेथील स्थानिक नागरिक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध कायम आहे.
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्भावना नगरातील दर्शन कॉलनीतील मैदानात ‘वज्रमूठ’ सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम असून तेथील स्थानिक नागरिक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध कायम आहे. या सभेसाठी मैदानावर मंचदेखील उभारण्यात आला असून तेथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे. २४ तास मैदानावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असून २० पोलीस दिवसरात्र बंदोबस्तावर आहेत.
दर्शन कॉलनीत १६ एप्रिल रोजी महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेवरून चांगलेच राजकारण पेटले आहे. पुर्व नागपुरचे आ.कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी या सभेला देण्यात आलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी नासुप्रकडे केली. स्थानिक नागरिकांनी आंदोलनदेखील केले. भाजपच्या शहराध्यक्षांचा या मैदानावर सभा घेण्यास आक्षेप नसताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र विरोध दर्शविला. हे खेळण्याचे मैदान असून ते सभेमुळे खराब होईल, असा दावा नागरिकांकडून करण्यात आला. तर महाविकासआघाडीचे नेते तेथेच सभा घेण्यावर ठाम आहेत.
या पार्श्वभूमीवर सभेसाठी तयारी सुरू झाली असून मंच उभारण्यात आला आहे. मात्र कुठलीही अनुचित घटना होऊ नये व कायदा-सुव्यवस्था खराब होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसा १० व रात्री १० पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. लवकरच बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली.
बुधवारी नागरिकांनी काढली रॅली
दरम्यान, वज्रमूठ सभेला विरोध करण्यासाठी बुधवारी स्थानिक नागरिकांनी परिसरात जनजागृती रॅली काढली. क्रीडा मैदान बचाव समितीतर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. यात स्थानिक नागरिकांसह भाजपचे काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत रॅली होऊ देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी यावेळी बोलून दाखविली.