नागपूर : शांतिनगर काॅलनी येथील बाजार हटविण्यावरून महापालिकेने न्यायालयाची अवमानना केली आहे. मनपाने हा बाजार हटविण्यासाठी उच्च न्यायालयात शब्द दिला हाेता. मात्र, अनेक दिवस लाेटूनही महापालिकेने या अनधिकृत बाजारावर कारवाई केली नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
या आठवडी बाजारामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागताे. वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. वेंडर्सची मुजाेरी नागरिकांना सहन करावी लागते आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे दुसऱ्या दिवशी दुर्गंधीचा सामना करावा लागताे. काेराेना महामारीच्या काळात नियमांचा फज्जा उडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे. २०१८ पासून स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन, अतिक्रमण विभाग आणि स्थानिक नगरसेवकांना बाजार हटविण्यासाठी निवेदन सादर केले, पण उपयाेग झाला नाही. यानंतर, स्थानिक नागरिक शालिकराम बाेरकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. २०१८ मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली हाेती. या याचिकेच्या सुनावनीदरम्यान न्या.सुनील शुक्रे व न्या.राेहित देव यांच्या खंडपीठासमाेर महापालिकेने शांतिनगर काॅलनीतील बाजार हटविण्याचा शब्द दिला हाेता. मात्र, दाेन वर्षे लाेटूनही महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. प्रवर्तन विभागानेही अतिक्रमण हटविण्यासाठी पावले उचलली नाहीत. यावरून महापालिकेच्या दुर्लक्षितपणाचा नागरिकांना त्रास हाेत असून, ही न्यायालयाचीच अवमानना असल्याचा आराेप शालिकराम बाेरकर यांनी केला.