लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संचारबंदीबाबत पोलीस आयुक्तांकडून रविवारी रात्रीच सूचनावजा आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र, अनेकांनी खास करून उत्साही, उपद्रवी मंडळींनी विनाकारण इकडून तिकडे फिरत संचारबंदी झुगारण्याचा प्रयत्न केला. सकाळी ११ नंतर रस्त्यांवर वर्दळ वाढल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीच मोर्चा सांभाळला.
अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांना सोबत घेऊन त्यांनी सीताबर्डी, धंतोली परिसरात आणि नंतर दिवसभर शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. प्रत्येक क्षेत्रातील ठाणेदारांना संचारबंदीची वाट लावू पाहणाऱ्यांवर रस्त्यावर जाऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या पार्श्वभूमीवर, विविध भागात पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडलेल्या, सैरसपाटा करण्याच्या मूडमध्ये असलेल्या अनेकांना कुठे पायावर तर कुठे मागच्या भागावर लाठ्या हाणल्या. काहींना उठाबशा काढण्यास भाग पाडले. गस्ती वाहनांच्या भोंग्यातून पोलीस माहितीवजा इशारा देऊ लागले. कारवाईचा हा सपाटा सुरू झाल्यानंतर रविवारप्रमाणे सोमवारी दुपारनंतरही रस्ते ओस पडले. चौकातही गर्दी दिसेनाशी झाली. दुकानांत मात्र चहलपहल दिसत होती. मोमिनपुऱ्यात काही मंडळी हुल्लडबाजी करीत असल्याचे कळताच आरसीपीची तीन वाहने भरून पथके धावली. सुताईनंतर पाच मिनिटातच संचारबंदीचे चित्र दिसू लागले.... तर पोलीस तुमची सेवा करतील !नागरिकांनी घराबाहेर पडू नये, संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, यासाठी शहर पोलिसांकडून वारंवार आणि वेगवेगळे सूचना, आदेश निगर्मित केले आहेत. अशातीलच एक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन जात आहे. तो मेसेज पुढीलप्रमाणे आहे.मीच माझा रक्षकशहरात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी, जमावबंदी करण्यात आली आहे. आपण अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा. आपण काम नसताना मुद्दामहून घराबाहेर पडले तर पोलीस आपली नक्की सेवा करतील, असा हा मेसेज आहे. यातील ‘मुद्दामहून आणि नक्की सेवा’चा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.पोलिसांनी ३५४ वाहने ताब्यात घेतलीसंचारबंदी अर्थात् बाहेर फिरण्यास मनाई असूनही अत्यावश्यक काम नसतानादेखील इकडून तिकडे फिरणारी ३५४ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यात ३ बस, २० ओला-उबेर, ३६ ई रिक्षा, २१ मोटरसायकल आणि २७४ इतर वाहनांचा समावेश आहे.बजाजनगर पोलिसांची माणुसकीरेल्वेस्थानकावर अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील २८ प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी केली. प्रवासी उपाशी असल्याची माहिती कळताच क्षीरसागर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रेल्वेस्थानक गाठून त्यांना जेवणाचे पार्सल दिले.