दयानंद पाईकराव, राजेश टिकले
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सक्करदरा येथील कोअर फिटनेस जीम मात्र खुलेआम सुरू आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या बाजूलाच हा जीम असूनही पोलीस त्यावर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सक्करदरा चौकातील महाराजा मॉलच्या समोर कोअर फिटनेस जीम आहे. हा जीम लॉकडाऊनच्या काळातही खुलेआम सुरू आहे. येथे सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी नागरिक येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही या जीमचा संचालक इतरांचे प्राण धोक्यात टाकत आहे. या जीममध्ये व्यायामाचे एक साहित्य अनेकजण वापरत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून हा जीम सुरू ठेवण्यात आला आहे. `लोकमत`ला या प्रकाराबाबत काही जागरूक नागरिकांनी कळविल्यानंतर सकाळी ७.३० वाजता या जीमजवळ फेरफटका मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. जीमच्या बाजूला असलेल्या रेशीमबाग येथील एका गल्लीत जीममध्ये येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या दुचाकी उभ्या केल्या होत्या. वृत्तपत्राचे प्रतिनिधी आल्याची बाब एका बाजूच्या दुकानदाराने जीमच्या संचालकाला कळविल्यानंतर तो जीमजवळ आला. जीममध्ये सकाळी ८ वाजता दुसरे ग्राहक येत होते. परंतु जीमच्या संचालकाने त्यांना बाहेरच्या बाहेर परतवून लावले. जीममध्ये असलेले ग्राहक तब्बल पाऊणतास आत अडकून पडले होते. त्यानंतर सकाळी ८.१५ वाजता दोन ग्राहक बाहेर आले. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असतानाही जीम खुलेआम सुरू असल्यामुळे रेशीमबाग येथील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.
...........
पोलीस ठाण्याच्या शेजारील प्रकार
दुकान बंद करण्यासाठी उशीर झाल्यामुळे पोलिसांनी एका गरीब भाजीविक्रेत्या महिलेची भाजी रस्त्यावर फेकली होती. परंतु सक्करदरा पोलीस ठाण्याच्या बाजूलाच सकाळी आणि सायंकाळी हा जीम खुलेआम सुरू असताना अद्याप या जीमवर कारवाई का करण्यात आली नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकारात सक्करदरा पोलीस ठाण्यातील काही पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे मत सक्करदरा चौकातील काही दुकानदारांनी व्यक्त केले.