लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढत असल्याने विनाकारण घराबाहेर पडू नका, असे विनंतीवजा आवाहन करून तसेच कारवाईचा इशारा देऊनही बेजबाबदार मंडळी ऐकायला तयार नाही. शहरात लॉकडाऊन असूनही मोठ्या संख्येत बेजबाबदार मंडळी मुक्तपणे घराबाहेर फिरताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात पोलिसांनी ४,१४५ जणांवर कारवाई केली. त्यातून ही संतापजनक बाब उघड झाली आहे. त्याचमुळे हे रिकामटेकडे कधी आणि कसे वठणीवर येणार, असाही संतापजनक सवाल चर्चेला आला आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. यामुळे शहरात सोमवारपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका रोखण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरू नका, असे आवाहन केले जात आहे. कारण नसताना रस्त्यावर किंवा बाजारात फिरताना आढळल्यास कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. सोमवारचा अनुभव बघता पोलिसांनी शहरातील दहीबाजार, पाचपावलीसह काही उड्डाणपुलावरची वाहतूक बंद केली होती. मात्र, बेजबाबदार मंडळी ऐकायला तयार नाही. ठिकठिकाणी पोलीस रस्त्यावर असूनही अनेक जण नुसतेच इकडेतिकडे फिरताना दिसत होते. आज लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या अशा ४,१४५ रिकामटेकड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. १,३४७ वाहने ताब्यात घेतली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसोबत वाद घालून ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर ४१ गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईचे स्वरूप
वाहने जप्त - १,४५१
चालान कारवाई - १,०८६
नो मास्क - ७३७
सोशल डिस्टन्सिंग - ८७१