लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्र आणि संस्थांना फटका बसला आहे. अनेक संस्थांचे वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचे गणित बिघडले आहे. यातच केवळ उन्हाळ्यात विद्यार्थी, महिला आणि पुरुषांना अल्प कालावधीचे प्रशिक्षण देणाऱ्या संगणक संस्थांचे यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना लॉकडाऊनमुळे वर्ग न भरल्याने या व्यावसायिक संस्थांचे कंबरडे मोडले आहे. बँकांचे कर्ज फेडण्याची समस्या संचालकांसमोर उभी राहिली आहे.नागपूर जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त संगणक प्रशिक्षण संस्था आहेत. चार महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये या संस्थांतर्फे विविध अल्प कालावधीचे कोर्सेस राबविले जातात. चार महिन्यात येणाºया मिळकतीच्या भरोशावर वर्षभराचा खर्च संचालक चालवितात. पण यंदा उन्हाळी सुट्यांच्या वर्गांना झळ बसल्याने सर्व संंस्थांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले असून संगणक प्रशिक्षक संचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.जागनाथ बुधवारी येथील संस्थाचालक मिलिंद मानापुरे म्हणाले, उन्हाळ्याच्या सुटीत विविध प्रकारचे संगणकाचे अल्प कालावधीचे कोर्सेस संस्थातर्फे चालविले जातात. या कोर्र्सेसला विद्यार्थ्यांपासून महिला, पुरुष आणि वयस्क यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे संस्थाचालकांना वर्षभराची मिळकत होते. अनेक संस्था १५ ते २० वर्षांपासून कार्यरत आहेत. शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी कोर्र्सेसला हजेरी लावतात. पण यावर्षी कोरोनामुळे सर्वांना घराबाहेर पडण्यास मनाई केल्याने संस्थांमध्ये कुणाचेही प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे या सर्व संस्थांचे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. या संस्थांना आर्थिक मदतीची गरज आहे.सर्व संस्था बँकांमधून कर्ज काढून उभ्या राहिल्या आहेत. पण आता हप्तेही भरणे कठीण झाले आहेत. संस्थांमधील कोर्सेसची फी तीन ते पाच हजार रुपये असते. त्या माध्यमातून या संस्थांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. मात्र लॉकडाऊनमुळे सगळे प्रशिक्षण बंद आहे. लाखो रुपये गुंतवणूक संस्था उभी करणाऱ्या संचालकांना केवळ उन्हाळी सुटीच्या बॅचेस वर्षभरासाठी उपयोगी ठरतात. पण कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले असून त्याचा फटका वर्षभरासाठी बसला आहे. त्यामुळे सर्व संगणक संस्थाचालक हतबल झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे संगणक संस्थांचे गणित बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 7:23 PM