लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोर घरात आहेत, गुंड घरी आहेत. एकीकडे दारूची दुकानेही बंद आहेत. लोकही घरी आहेत. चोरीची संधी नाही, कुठला गुन्हा घडविण्यासाठी बाहेर पडता येत नाही. गुंडांनीच स्वत:ला ‘लॉकडाऊन’ करून घेतल्याने शहरात गेल्या २४ तासात एकही गंभीर गुन्हा दाखल झालेला नाही. यानिमित्ताने का होईना नागपुरातील गुन्हेगारी शून्यावर आल्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.४० लाख लोकसंख्येच्या उपराजधानीत ३२ पोलीस स्टेशन आहेत. अनेक संवेदनशील परिसर, झोपडपट्ट्या आहेत. खतरनाक गुंडांच्या अनेक टोळ्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात येथे अवैध धंदेही चालतात. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड मोठे आहे. येथे नेहमीच गंभीर गुन्हे घडतात. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नागपूरला क्राइम कॅपिटल असेही उपहासाने संबोधले जात होते. मात्र दोन वर्षांपूर्वी पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात रुजू झालेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्या. मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकाची कारवाई करून गुंडांना कारागृहात डांबले. अनेक खतरनाक आणि सराईत गुन्हेगारांवर एमपीडीची कारवाई करून त्यांनाही कारागृहात स्थानबद्ध केले. त्यामुळे गेल्या वर्षभरात नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच घटले होते. तरीसुद्धा अधूनमधून खून, खुनाचे प्रयत्न बलात्कार, खंडणी वसुली, हाणामाऱ्या, घरफोडी, चोºया, लूटमार आणि चेनस्नॅचिंग असे गुन्हे घडतच असतात.अवैध दारूविक्री, मटका, बुकी, हवाला, जुगारही येथे सुरू असतो. पोलिसांकडून त्यांच्यावर अधूनमधून कारवाईदेखील होत असते. सध्या कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वजण घरात बसून असल्याने गेल्या काही दिवसात नागपुरातील गुन्हेगारी चांगली थंडावली, तरीसुद्धा छुटपूट गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आहेच. मात्र गेल्या २४ तासात नागपुरात एकही गंभीर गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील ३२ ही पोलिस ठाण्याचा अहवाल पोलिसांच्या माहिती कक्षाकडून घेण्यात आला. त्यात एकाही पोलिस ठाण्यात जमावबंदीच्या उल्लंघनाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त कोणताच मोठा गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्पष्ट झाले. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.