वाडी/कामठी/हिंगणा: नागपूर शहर पोलीस हद्दीत सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याचा इफेक्ट ग्रामीण भागातही दिसून आला. शहराच्या हद्दीत विना कामाने प्रवेश करणाऱ्यांना पोलिसांनी परतवून लावले. ग्रामीण भागात हिंगणा, कोराडी, वाडी आणि कामठी येथे लॉकडाऊनची पहिल्या दिवशी प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या चारही शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद होती. या लॉकडाऊनमुळे गरिबांचा मात्र रोजगार हिरावला जातोय. याबाबत प्रशासनाने भूमिका मांडावी अशी मागणी संबंधित वर्गातून करण्यात आली. वाडीत लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, विना मास्क वावरणाऱ्या तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ४७ लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९,४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच विविध चालानच्या माध्यमातून ६ हजार दंड वसूल करण्यात आला. यासोबतच ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आली. नाका नं. १० वर सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पवन ठाकरे, तुरकेश बुडेकर,आनंद रावत, मनोज भांगे, अशोक राय, धनराज भोले यांनी तगडा बंदोबस्त ठेवत शहरात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली.
कोराडीत कडक बंदोबस्त
कोराडी पोलीस स्टेशनच्या वतीने कोराडी नाका व महादुला टी पॉइंट येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन परत पाठविण्यात आले. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोराडी नाका या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने वाहनांवर मात्र कारवाई करण्यात आली नाही.