खापा : खापा शहर आणि परिसरातील शेतकरी कन्हान नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात डांगराची शेती करतात. यात ढिवर समाजाची संख्या जास्त आहे. मात्र हे फळ बाजारात आणताना उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यंदा परिसरात डांगरांचे चांगले उत्पादन झाले. मात्र शासनाच्या निर्धारित केलेल्या वेळेनुसार शेतकरी हे पीक बाजारात आणून विकू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत डांगर उत्पादक शेतकऱ्यांना सकाळी ११ ते ५ ही वेळ निर्धारित करून द्यावी, अशी विनंती मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. खापा परिसरातील डांगरांना जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मोठी मागणी आहे. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकऱ्यांना नदीपात्रातून बाजारपेठेपर्यंत माल आणण्यापर्यंत बराच कालावधी लागतो. याचा त्यांना फटका बसतो आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दामोदर कोल्हे, प्रभाकर कोल्हे, सुधीर कोल्हे, अरुण शेंडे, मनोहर लाड, विलास कोल्हे, रामदास मारबते, आदींचा समावेश होता.
डांगर उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:09 AM