नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे चांगलेच नुकसान झाले. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाला २७ लाखांचा फटका बसला. अनेक प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला होता.
प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सोमवारी एसटी महामंडळाला फटका बसला. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दररोज १ लाख ४० हजार किलोमीटर फेऱ्या बस करतात. परंतु, लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी पाठ फिरविल्यामुळे ८० हजार किलोमीटर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विभागात केवळ ६० हजार किलोमीटर बस धावल्या. एरवी दररोज विभागाला ४२ लाख रुपये उत्पन्न होते. परंतु, ८० हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्यामुळे सोमवारी विभागाला केवळ १५ लाख रुपये उत्पन्नावर समाधान मानावे लागले. विभागाचे २७ लाखांचे नुकसान झाले.
.................
एका बसमध्ये मिळाले केवळ १६ प्रवासी
लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाने ५० टक्के क्षमतेने बस चालविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एका सीटवर एक या प्रमाणे एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी बसविण्यात येणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द केल्यामुळे एका बसमध्ये सरासरी १६ प्रवासीच मिळू शकले.
...........