लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थव्यवस्थेचा कणा असलेले देशात सात कोटीपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंच्या व्यवसायाचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यावसायिक दुकाने आणि शोरूम बंद आहेत. त्यामुळे रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे. कोरोना महामारीपेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह ठरल्याचे भरतीया म्हणाले.संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून ३० एप्रिलपर्यंत देशात रिटेल व्यवसायात जवळपास ५.५० लाख कोटींचा व्यवसाय झाला नाही. व्यवसाय न झाल्याने किमान २० टक्के व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे १० टक्के अन्य व्यापारी व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. जवळपास ३ कोटी विक्रेत्यांचे शटर पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनने भारतीय रिटेल विक्रेत्यांचाा काही महिन्यांचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. या व्यावसायिकांचा व्यवसाय उभा राहण्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्याप्त आर्थिक पॅकेज देण्याची मागणी कॅटने पूर्वीच केली आहे. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारतीय रिटेल विक्रे त्यांचा व्यापार पूर्णपूर्ण बंद झाला आहे. त्याचा देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. देशातील रिटेल व्यावसायिक दररोज १५ हजार कोटींचा व्यवसाय करतात. ४० दिवसांपेक्षा जास्तच्या टाळेबंदीमुळे संपूर्ण व्यावसायिक संकटात आहेत. या व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ कोटी लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे.भरतीया म्हणाले, भारतातील कमीतकमी अडीच कोटी व्यापारी सूक्ष्म आणि लघु स्वरूपाचे आहेत. दुकाने दीर्घकाळ बंद असल्याने त्यापैकी अनेकांकडे पुढे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी भांडवल नाही. लॉकडाऊननंतर किमान ८ ते ९ महिने व्यवसाय रुळावर येण्यास लागतील. तोपर्यंत सर्वच विक्रेत्यांना मंदीचा सामना करावा लागेल. व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्यांना नोकरांचे पगार, दुकानाचे भाडे आणि इतर मासिक खर्च द्यावे लागतील आणि दुसरीकडे त्यांना कठोर सामाजिक अंतराच्या नियमांसह ग्राहकांना सेवा प्रदान कराव्या लागतील. त्याचा व्यवसायाला फटका बसण्याची भीती आहे. आर्थिक पॅकेजअभावी विक्रेत्यांच्या पुनरुज्जीवनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. आर्थिक महामारी ही कोरोना महामारीपेक्षा भयंकर ठरणार काय, अशी भीती भरतीया यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे रिटेल व्यवसायाचे ५.५० लाख कोटींचे नुकसान : ‘कॅट’चा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 8:20 PM
रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे.
ठळक मुद्देकोरोनापेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह