लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन हा उपाय नाही; मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला.
बैठकीत शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली. यावेळी फडणवीस यांनी, संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही. त्यामुळे रोजगार अडचणीत येतो. त्यामुळे कडक निर्बंध लावून व्यवहार व्हावेत, असे मत व्यक्त केले. नागपूर शहरात ८८ लसीकरण केंद्रे आहेत. त्यांची संख्या वाढवून ती १५१ व्हायला हवी. दररोज ८ ते १० हजार नागरिकांना लस दिली जाते आहे. ती ४० हजारांपर्यंत दिली जावी, असे सांगितले. तसेच लसीकरणासाठी सब सेंटर्स सुरू व्हावीत व या कामात एनजीओंची मदत घेतली जावी, अशीही सूचना त्यांनी मांडली.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी दवाखान्यांत जागा कमी पडत आहे. पुन्हा खासगी कोविड हॉस्पिटल्स सुरू केली जावीत. होम क्वारंटाईन असूनही बाहेर फिरणाऱ्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरवर न्यावे, अशीही सूचना मांडली गेली. प्रशासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्यात आम्ही सोबत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.