नागपूर : गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे काय हाल झाले हे सर्वांनाच माहीत आहे. प्रशासनाने तो अनुभव लक्षात घ्यावा आणि सोमवारपासून लागू केलेला लॉकडाऊन कडक नव्हे तर त्यात शिथिलता आणावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनातर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी याच महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हा मजूर, शेतमजूर यांच्या हातातून काम गेले. अनेकजण बेरोजगार झाले. बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यापोटी काहींनी आत्महत्या केली. लहान-मोठे व्यापारी डुबले. तेव्हा हा अनुभव पाठीशी असताना प्रशासनाने लॉकडाऊन कडक लागू करू नये. त्यात शिथिलता आणावी. सरसकट बंद करण्याऐवजी ५० टक्केवर दुकाने सुरु ठेवण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, विदर्भ संघटक भूषण भस्मे, जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी, विशाल मानवटकर,सुरेश मानवटकर
सेवक पाटील, अक्षय नंदेश्वर आदी उपस्थित होते.