नागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेला फोटोग्राफर वाहन चोरांची टोळी संचालित करीत होता. अमरावतीच्या अचलपूरवरून नागपूरला येऊन बाइक चोरी करण्यासाठी फोटोग्राफरसह तीन युवकांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४.२० लाख रुपये किमतीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
संकेत दीपक कडू (१९), साहिल दिनेश डवरे (२०) आणि अभिजीत संजय खडसे (२१) रा. अचलपूर, जि. अमरावती अशी वाहन चोरट्यांची नावे आहेत. संकेत हा टोळीचा सूत्रधार आहे. तो अचलपूरमध्ये फोटोग्राफीचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे लग्न आणि इतर समारंभ बंद झाले. त्यामुळे संकेतचे काम ठप्प झाले होते. आर्थिक टंचाईमुळे त्याची अवस्था बिकट झाली. रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे तो दुचाकी चोरी करू लागला. त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे साहिल आणि अभिजीतला आपल्या टोळीत सामील करून घेतले. त्यांच्यासोबत तो नागपूरला येत होता. ज्या दुचाकीला हँडल लॉक नाही, ती दुचाकी चोरून ते अचलपूरला परत जात होते. त्यांनी एका शेतात आणि गोदामात दुचाकी वाहने ठेवली होती. आरोपींनी २६ जूनला रात्री राजभवन उद्यानासमोर राहणाऱ्या विराग भेलावेची बुलेट त्याच्या घरासमोरून चोरी केली. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेला बुलेट संकेतजवळ असल्याची माहिती मिळाली. त्याची पुष्टी होताच, पोलिसांनी संकेतला दोन्ही साथीदारांसह अटक केली. आरोपी चोरी केलेल्या दुचाकी सुरक्षित ठिकाणी लपवित होते. ते अनेक दिवसांपासून ग्राहकाच्या शोधात होते. लॉकडाऊन आणि अचलपूर लहान शहर असल्यामुळे त्यांना ग्राहक मिळत नव्हते. त्यामुळे आरोपी चिंतेत होते. ग्राहकांच्या शोधात असताना, ते पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश गोसावी, श्रीकांत साबळे, पंकज लांडे, सचिन आंधळे आणि हिमांशू ठाकूर यांनी पार पाडली.
...........