गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडे जीवनश्ौली बदलली. लाकडी कपाटे, फर्निचरची जागा स्टीलने घेतली. अशातही जमेल तशी कामे करून सुतार समाज जगत होता, मात्र आता लॉकडाऊनच्या दिवसात सर्वकाही बंद पडल्याने कारागिरांचे हात थांबले आहेत. त्यामुळे या समाजाचे सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास ५० हजार सुतार कारागीर आहेत. यापैकी एकट्या नागपूर शहरात ३५ हजार कारागीर आहेत. एकेकाळी लाकडी फर्निचरचे प्रचलन होते. दिवाणखाना, दारे, खिडक्या, घराचा तस्मा हे सर्व लाकडीच असायचे. त्यामुळे सुतार समाजाचे दिवस चांगले होते. शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयातील टेबल, खुर्च्या, बेंचेसदेखील लाकडी असायचे. त्यामुळे मोठा व्यवसाय यातून उभा होता. यावर आधारित असलेल्या आरागिरण्यांनाही चांगले दिवस होते. मात्र पर्यावरणाच्या कायद्यामध्ये अनेक आरागिरण्या बंद पडल्या. लाकूडकटाई बंद झाल्याने उरलेल्या आरागिरण्यांना कामच राहिले नाही. नाईलाजाने अनेकांना हा व्यवसाय बंद करावा लागला. एकेकाळच्या आरागिरण्यांच्या ठिकाणी आता गोदाम उभे झाले आहेत. परिणामत: आरागिरण्यांवर अवलंबून असलेला व्यवसाय ठप्प पडला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, त्याची मोठी झळ सुतार समाजाला बसत आहे.नोव्हेंबर ते जून हा साधारणत: लग्नसराईचा हंगाम असतो. यंदा पहिले तीन महिने मुहूर्तच नव्हते, नंतर मार्चपासून कोरोनाचा कहर वाढला. लॉकडाऊन झाले. अनेक लग्नकार्ये पुढे ढकलल्या गेली. अनेकांनी साधेपणाने लग्न उरकले. यामुळे लग्नाच्या निमित्ताने होणारी फर्निचरची खरेदी थांबली. आर्थिक उलाढाल थांबल्याने सुतार कारागिरांना व त्यांच्या कुटुंबीयांना झळ बसली.सध्या लॉकडाऊनच्या दिवसात या कारागिरांना घरी बसावे लागले आहे. आधीही रोजगार नव्हता. त्यामुळे बांधकामासारख्या कामावर जाऊन हे कारागीर उपजीविका करीत होते. आता तेसुद्धा काम थांबल्याने अनेक कुटुंबांपुढे उपासमारीचे संकट उभे झाले आहे. यातून सरकारने मार्ग काढून द्यावा, अशी या समाजाची मागणी आहे.सरकारने या काळामध्ये सुतार समाजाच्या समस्या लक्षात घ्याव्यात. हाताला काम नसल्याने व आधीही म्हणावा तसा रोजगार नसल्याने समाजापुढे मोठे संकट उभे झाले आहे. या समाजाला शासनाने अर्थसाहाय्य देऊन सक्षम करावे.-पंडित देवीकर, अध्यक्ष, पांचाळ सुतार सेवा संघटना, नागपूर