लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत विदर्भ राज्य आंदाोलन समितीने शनिवारी महावितरणच्या गणेशपेठ बसस्थानकाजवळील कार्यालयाला टाळे ठोकले. कार्यकर्त्यांनी बॅनरला काळे फासण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.
समितीच्या कार्यकर्त्यांनी मुकेश मासूरकर, अजय साहू, व सुनिता येरणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. गुर्जरवाडी येथून मोर्चा काढून कार्यकर्ते कार्यालयापर्यंत पोहोचले. कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करण्यात यावे, २०० युनिटपर्यंतची वीज नि:शुल्क देण्यात यावी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री व राज्य सरकारविरोधात नारेबाजी केली. मागणी पूर्ण होत नाही तोवर नागिरकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आंदोलनात प्रशांत जयकुमार, जया चातुरकर, रवींद्र भामोडे, रेखा निमजे, प्यारूभाई, प्रशांत मुळे, राजेंद्र सतई, गुलाबराव धांडे, नरेश निमजे, गणेश शर्मा, देवा धात्रक, नितीन अवस्थी, शोभा येवले, कृष्णा मोहबिया, वीणा भोयर, माधुरी चव्हाण, ज्योती मेश्राम, शादाब खान, अरुण केदार, वर्षा इंदूरकर, अनिता खापेकर आदी उपस्थित होते.