लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सन १९५२. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख राजकीय केंद्र म्हणून उदयाला आले होते. विविध चळवळी येथे बाळसे धरायला लागल्या होत्या. सामाजिक व राजकीय परीघ वाढीस लागला होता. नागपूरच्या इतिहासात हे वर्ष सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले. याच वर्षी नागपूरला पहिल्या आणि त्या देखील एक महिला खासदार म्हणून प्राप्त झाल्या. १९५२ साली देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. पहिलीच निवडणूक असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. नागपूरचे राजकीय महत्त्व पाहता येथील जागेकडे सर्वांच्याच नजरा होता. नागपूरसाठी ही निवडणूक वेगळा इतिहास लिहिणारीच ठरली.त्यावेळची राजकीय स्थिती पाहता काँग्रेस व सोशालिस्ट पक्ष यांच्यात टक्कर होती. याशिवाय अखिल भारतीय हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पक्ष यांच्या उमेदवारांसह एकूण पाच जण रिंगणात होते.कॉंग्रेसने नागपुरातून महिला उमेदवार अनुसूूयाबाई काळे यांना तिकीट दिले. त्यांचा सामना होता तो सोशॅलिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही.एस.उपाख्य आचार्य दांडेकर यांच्याशी. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचाराला भिडले होते.प्रचाराची साधने मर्यादित होती. मात्र तरीदेखील सुमारे दोन महिने प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. निवडणूकांत ५९.५ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता निकालांच्या वेळी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. मात्र अनुसूयाबाई काळे या विजयी झाल्या. एकूण मतांपैकी त्यांना ४९.३ टक्के मते प्राप्त झाली. तर आचार्य दांडेकरांना २१.२ टक्के मते मिळाली होती. किसान मजदूर प्रजा पक्षाच्या उमेदवाराला १०.६ टक्के मते तर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या उमेदवाराला २.९ टक्के मते मिळाली होती.
लोकसभा १९५२; अनुसूयाबाई काळे ठरल्या होत्या पहिल्या खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:25 AM
सन १९५२. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख राजकीय केंद्र म्हणून उदयाला आले होते. विविध चळवळी येथे बाळसे धरायला लागल्या होत्या.
ठळक मुद्देकाँग्रेस व सोशालिस्ट पक्षात रंगली होती लढत