काँग्रेस महारॅलीतून फुंकणार लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग

By जितेंद्र ढवळे | Published: December 27, 2023 07:45 PM2023-12-27T19:45:53+5:302023-12-27T19:47:33+5:30

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील.

Lok Sabha campaign will be blown from Congress rally in nagpur | काँग्रेस महारॅलीतून फुंकणार लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग

काँग्रेस महारॅलीतून फुंकणार लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग

नागपूर : कॉंग्रेसच्या १३८व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी (दि. २८) नागपुरात ‘हैं तयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी २ वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात कॉंग्रेस लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. इकडे महारॅलीसाठी विदर्भातील कॉंग्रेसजणात मोठा उत्साह दिसून येतो आहे. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील कॉंग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. बुधवारीही देशातील प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. महारॅलीतून भाजपच्या अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोेले यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही., प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा.इमराम प्रतापगडी, शहराध्यक्ष विकास ठाकरे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीही सभास्थळाची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आ. अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, गिरीश पांडव यावेळी उपस्थित होते.

ईडी, सीबीआयचा धाक दाखवून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले. काँग्रेस अशा कारवायांना भीक घालत नाही. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा नारा दिला आहे, त्याच मार्गाने जाऊन भाजपला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास पटोले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Web Title: Lok Sabha campaign will be blown from Congress rally in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.