योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी नागपूर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. ३३ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर २४ टक्के जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ४५ टक्के उमेदवार हे पदवी किंवा त्याहून अधिक शिकले आहेत. २१ टक्के उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षित आहेत. तर अवघ्या एका उमेदवाराकडे आचार्य पदवी आहे.३६ टक्के उमेदवार हे बारावीपर्यंत शिकलेले आहेत. तर १५ टक्के उमेदवार हे दहावी उत्तीर्ण आहेत. एकही उमेदवार निरक्षर नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. एका उमेदवाराने शिक्षणाचा तपशीलच दिलेला नाही.
विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत २६ टक्के उमेदवार हे विधी पदवीधर तर २६ टक्के उमेदवार हे कला विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे प्रत्येकी १२ टक्के इतके आहे. दोन उमेदवार हे वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत.
उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे १५ टक्के उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. ५२ टक्के उमेदवार हे बारावी उत्तीर्ण आहेत. तर उर्वरित उमेदवार दहावी उत्तीर्णच आहेत. राजकीय पक्षांतील एकूण ६० टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत.