लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.दक्षिण नागपुरातील तिरंगा चौक येथे रविवारी रात्री काँग्रेसची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार कुमार केतकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार गेव्हा आवारी, पीरिपाचे नेते जयदीप कवाडे, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी हे त्यांनी पाच वर्षात काय केले ते सांगत नाहीत. मुद्यांवर किंवा जाहीरनाम्यावर बोलत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांवर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करीत आहे. नोटबंदी हा अविचारी निर्णय होता. तो देशातील सर्वात मोठा ‘मनिलाँड्रीगचा फ्रॉड’ असल्याचे भाजपचेच नेते अरुण शौरी यांनी सांगितले आहे. जीएसटी चांगला निर्णय होता परंतु तो किचकट करून ठेवला. २३ मे नंतर नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदावर दिसणार नाहीत. भाजपचा कुठलाच नेता पंतप्रधान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. प्रा. वसंत पुरके यांनीही भाजप सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, या जगात डिजिटल करप्शन कुणी केले असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एक व्यक्ती बिनडोक निर्णय घेते. विज्ञान आणि मोदी यांचा काहीही संबंध नाही. राजीव गांधी यांचा जन्म झाला नसता तर नरेंद्र मोदी यांना कुत्र्यानेही हुंगले नसते, असे आक्षेपार्ह वक्तव्यही त्यांनी केले.
मोदींच्या उधळपट्टींमुळे अर्थव्यवस्था डबघाईस : केतकरनरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात रिझर्व्ह बँकेशी सातत्याने खोटा व्यवहार केला. त्यांच्यामुळे रघुराम राजन यांना जावे लागले. ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. पाच वर्षात मोदींनी बेफाम उधळपट्टी केली. स्वत:च्या जाहिरातीवर सर्वाधिक उधळपट्टी केली. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कर्ज घेतल्याशिवाय या देशाचा व्यवहारच चालू शकणार नाही, अशी परिस्थिती असल्याची टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.