योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: पन्नाशी उलटल्यानंतरच खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होते व निवडणुकांत उतरण्याची सुरुवात या टप्प्यानंतर होते असे एरवी म्हणतात. मात्र गेल्या काही काळापासून ही धारणा मोडीत निघाली असून नागपूर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार हे पन्नाशीच्या आतीलच आहेत.जर एकूण सरासरी काढली तर नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय हे ४६ वर्ष इतके आहे. नागपुरातील सर्वात तरुण उमेदवार हा २८ वर्षांचा आहे तर सर्वात वयस्क उमेदवार ६४ वर्षांचे आहेत हे विशेष.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ३० उमेदवार भाग्य आजमावत आहेत.मागील अनेक निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये बरीच जागृती आली आहे. तरुणाईच्या मतांना महत्त्व आले असून यामुळेच राजकीय पक्षांचा चेहरादेखील तरुण होत आहे. त्याप्रमाणे अपक्ष म्हणून उतरण्यासाठीदेखील पन्नाशीच्या आतील उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून आली. नागपुरातील ७६ टक्के उमेदवार हे ५० हून कमी वय असलेले आहेत. तर २६ टक्के उमेदवारांचे वय हे चाळीस किंवा त्याहून कमी आहे. तिशीच्या आतील एक उमेदवार रिंगणात आहे.
चाळिशीच्या आतील एकच अपक्षमतदारसंघात चाळीशीच्या आतील २६ टक्के उमेदवार रिंगणात आहेत. यातील ८८ टक्के उमेदवार हे राजकीय पक्षांकडून उतरविण्यात आले आहेत. तर चाळीशीच्या आतील अवघा एक अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभा ठाकला आहे. १२ अपक्ष उमेदवारांपैकी ७५ टक्के उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटातील आहेत. तर अवघे दोन उमेदवार हे पन्नाशीहून अधिक वयाचे आहेत.
खासगी, व्यावसायिकांचे प्रमाण अधिकएकूण उमेदवारांपैकी एकूण ६० टक्के उमेदवार हे एकतर खासगी काम किंवा व्यवसाय करणारे आहेत. या दोन्हींचे प्रमाण प्रत्येकी ३० टक्के इतके आहे. १३ टक्के उमेदवार हे शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. तर १० टक्के उमेदवार वकील आहेत. याशिवाय ७ टक्के उमेदवार शिक्षक असून समाजसेवा व वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येकी एक उमेदवार काम करत आहे. केवळ एक उमेदवार गृहिणी आहे. १२ अपक्षांमध्ये ४१ टक्के उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. तर ३३ टक्के उमेदवार खासगी काम करणारे आहेत. राजकीय पक्षांत २८ टक्के उमेदवार हे खासगी काम करणारे असून १७ टक्के उमेदवार हे शेतकरी आहेत. २२ टक्के उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत.