मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सुरू आहे. देशपातळीवर भाजपाच्या प्रचाराचे ‘थीम साँग’ ‘हा मै भी चौकीदार हू...’ हे जोरात गाजत आहे. तर काँग्रेसनेसुद्धा ‘सब की यही पुकार, काँग्रेस है इस बार’ राजकीय पक्षांची ही गीते मतदारांच्या कानामनात गुंजत असताना नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात प्रचाराचा फिल्मी फंडा राजकीय पक्षाने आणला आहे. यात काँग्रेसच्या उमेदवारांनी झिंगाटच्या गाण्यावर तर भाजपाच्या उमेदवारांनी बाजीरावच्या गाण्यावर उपराजधानी दणाणून सोडली आहे.निवडणुकीच्या काळात ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार जनमानसात पोहोचविण्यासाठी म्युझिक कम्पोझर आणि रेकॉर्डिस्ट चारुदत्त जिचकार प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्याकडे रामटेक आणि नागपूर या मतदार संघातील मुख्य राजकीय पक्षांची प्रचाराची गीते तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी चर्चेत असलेल्या गीतांवर त्यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रचार गीत तयार केले आहे. त्यामध्ये झिंगाट, बाजीराव या सिनेमातील लोकप्रिय गीतांवर उमेदवारांचे गुणवैशिष्ट्य आणि त्यांचा निवडणुकीतील अजेंडा लक्षात घेऊन गीते कम्पोज केली आहेत. नागपूरच्या भाजप उमेदवारासाठी त्यांनी बंदे मे है दम..., माऊली माऊली... या गीतांचीही रचना केली आहे. त्याचबरोबर स्वत:च लिहिलेली आणि स्वत:च क म्पोज केलेली गीते, रॅप साँगसुद्धा प्रचारासाठी तयार केले आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने खास गावराणी स्टाईलचा पोवाडा आणि मराठी गीतांचा प्रचारासाठी उपयोग केला आहे. त्याचबरोबर भाजपासाठी त्यांनी पथनाट्य रचले आहे. याशिवाय उमेदवाराच्या कामाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. ऑटोमधून करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रचारसीडी तयार केल्या आहेत. सध्या त्यांच्या या रेकॉर्डिंग स्टुडिओत राजकीय सांगितिक वातावरण आले आहे.
दिवस-रात्र सुरू आहे कामप्रत्येक पक्षाने नियुक्त केलेल्या मीडिया प्रमुखांकडे प्रचाराची धुरा सोपविली आहे. प्रचार कसा प्रभावी ठरेल यासाठी त्यांच्या डिमांड स्टुडिओत येत आहेत. व्हॉट्सअॅपवर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, ऑटोतील प्रचार, मेळाव्यातील प्रचार, शहरात स्क्रीन लावलेल्या फिरणाऱ्या गाड्यांसाठी डॉक्युमेंट्री अशा वेगवेगळ्या माध्यमासाठी प्रचार गीत रचले जात आहे. त्यासाठी लेखक, गायक, म्युझिक कम्पोझर, रेकॉर्डिस्ट दिवस-रात्र काम करीत आहे. प्रचाराचा वेळ कमी असल्याने या माध्यमांची डिमांड वाढली आहे.
प्रचारात देशभक्तिपर गीतांची डिमांड कमीपूर्वी प्रचारात देशभक्तिपर गीतांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. आता मात्र देशभक्तिपर गीते मागे पडली आहे. तुलनेत जास्त चर्चेत असलेली गीते, लोकांच्या कानामनात असलेली गीते प्रचारात जास्त प्रभावी ठरत आहे. जाहीर मेळाव्यात ही गीते लोक अगदी लक्ष देऊन ऐकतात. मनोरंजन सुद्धा या गीतांद्वारे होते. त्याचबरोबर अॅन्टी प्रचार गीते मत परिवर्तनासाठी जास्त प्रभावी ठरतात. उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह जास्तीतजास्त मतदारांवर हॅमर व्हावे यासाठी चर्चेत असलेली गीते प्रचारात जास्त वापरली जातात.- चारुदत्त जिचकार, म्युझिक अरेंजर, कम्पोझर आणि रेकॉर्डिस्ट