लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातून शुक्रवारी नऊ उमेदवारांनी तर रामटेकमधून केवळ दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. शनिवार आणि रविवार शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे कृपाल तुमाने हे प्रमुख उमेदवार सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी सोमवार १८ मार्चपासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ मार्च रोजी धुलिवंदनाची सुटी आली. २३ मार्च हा चौथा शनिवार आणि २४ मार्च रोजी रविवार असल्याने सुटी आली. तेव्हा उमेदवारांना १८, १९, २०, २२ व २५ मार्च असे पाच दिवस उमेदवारी अर्ज सादर करायला मिळाले. परंतु पहिल्या तीन दिवसात नागपूर लोकसभेसाठी केवळ तीन अर्ज सादर झाले. रामटेकसाठी एकही अर्ज सादर झाला नाही. शुक्रवारी नागपुरातून नऊ आणि रामटेकमधून दोघांनी अर्ज सादर केला. शनिवार आणि रविवार सुटी आहे. तेव्हा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस उरला आहे. त्या दिवशी प्रमुख उमेदवारांसह सर्व इच्छुक अर्ज सादर करतील. काँग्रेस-भाजप-शिवसेना या प्रमुख पक्षाचे उमेदवार अर्ज सादर करणार असल्याने कार्यकर्त्यांनी संख्याही मोठ्या प्रमाणावर राहील.
जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गेट सुरूनागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण तीन गेट आहे. दोन गेटचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. सेतू कार्यालयाजवळचे एकमेव गेट सुरू आहे. तेथूनच सर्वांची ये-जा आहे. सोमवारी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, तेव्हा एकच गेट सुरू असल्याने मोठी पंचाईत होणार आहे.
१७९ लोकांनी घेतले २३३ अर्जनागपूर व रामटेक लोकसभा मिळून आतापर्यंत १७९ इच्छुकांनी २३३ अर्ज घेतले. परंतु केवळ १४ इच्छुकांनीच अर्ज सादर केले. यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघासाठी आतापर्यंत एकूण १२१ इच्छुकांनी १४८ अर्ज घेतले. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांनी ८५ अर्ज घेतले.